(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी सिनेसृष्टीतील एक वेगळा आणि संवेदनशील दृष्टिकोन मांडणारा ‘साबर बोंड’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट अलिकडेच रिलीज झाला आहे. या चित्रपटाने ‘सनडान्स फेस्टिव्हल’मध्ये ‘ग्रँड ज्युरी प्राइझ’ हा पुरस्कार मिळवला आहे. रोहन कानवडे दिग्दर्शित या सिनेमासाठी निर्माते म्हणून मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गजही एकवटले आहेत. प्रेक्षक आणि अनेक कलाकार मंडळींनी या सिनेमाचे कौतुक केलं आहे. अभिनेत्री मुक्ता बर्वै हिने या सिनेमाविषयी आणि यामध्ये काम करणाऱ्या तिच्या जवळच्या मैत्रिणीबद्दल खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये अभिनेत्री मुक्ता बर्वै ने तिच्या मैत्रिणीसोबत फोटो टाकत लिहिले आहे की, ”एक सुंदर सिनेमा बघितला ‘साबर बोंडं’. लेखक-दिग्दर्शक रोहन कानवडे, त्याची सगळी टीम, म्हणजे पडद्यावरचे-मागचे सगळे कलाकार, हा सुखद अनुभव दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कोणताही अभिनिवेष नसलेला, गणित मांडून चौकटीत न बसवलेला हा सिनेमा. मला अगदी नकळत, अलगद, थेट सिनेमाच्या आतल्या जगात घेऊन गेला. पडद्यावर कोणी अभिनय करतंय असं वाटतंच नव्हतं. थिएटरमध्ये बसून मला गोष्टीतल्या हवेतला गारवा जाणवला, नदीच्या पाण्याचा थंडपणा अंगात शिरला, उन्हाचा चटका लागला, अनवाणी चालताना काटाही रुतला आणि मी खऱ्या आयुष्यात कधीच न चाखलेल्या साबर बोंडा ची चवही तृप्त करून गेली.”
”आज पहिल्यांदा देवीची स्थापना माझ्या डोळ्यादेखत झाली नाही”, अभिनेत्री पूजा सावंतने केली खंत व्यक्त
साबर बोंडं या चित्रपटात आनंद या पात्राच्या आईच्या भूमिकेत अभिनेत्री जयश्री जगताप झळकली आहे. आपल्या मैत्रिणीबद्दल मुक्ताने लिहिले की, ”जयश्री माझी जवळची लाडकी मैत्रीण, ती दोन तास मला ‘आनंद ची आई’ च वाटली. जयू तुझं खूप कौतुक आणि प्रेम. असं आतून आलेलं, चांगलं काम आपल्या भाषेत होताना बघितलं की अभिमानानी मन भरून येतं, अमूर्त वाटणाऱ्या चांगल्या कल्पना नक्की सत्यात उतरतील अशी खात्री वाटते, चांगलं काहीतरी करण्यचा हुरूप येतो. मोठ्या पडद्यावर एक सकस अनुभव घेण्यासाठी ‘ साबर बोंडं’ नक्की बघा. अस कॅप्शन देत मुक्ताने ही पोस्ट शेअर केली आहे.