(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
टॉलीवूडचा सुपरस्टार पवन कल्याण पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जोरदार परतला आहे, आणि त्याच्या नव्या अॅक्शन थ्रिलर चित्रपट “They Call Him OG” ने बॉक्स ऑफिसवर चांगलाच दणका दिला आहे. या सिनेमात पवन कल्याणने एका गूढ आणि धोकादायक गँगस्टर ओजस ‘OG’ घंभीर याची भूमिका साकारली आहे. २५ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात 100 कोटींची कमाई केली,“OG” ने जगभरात तब्बल 154 कोटी कमावत ऐतिहासिक ओपनिंग केली. तर आता पर्यंत या चित्रपटाने एकूण 211 कोटी जागतिक कमाई केली आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून 20कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम कमाई केली होती.
दिग्दर्शक सुजीत यांच्या शैलीदार मांडणीमुळे आणि पवन कल्याण व इमरान हाश्मी यांच्या जबरदस्त अभिनयामुळे प्रेक्षक भारावून गेले आहेत. सोशल मीडियावर पवनच्या अभिनयाची प्रचंड चर्चा असून त्याच्या चाहत्यांनी सिनेमागृहात गर्दी केली आहे. पवन कल्याण आणि इमरान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका असलेला अॅक्शन थ्रिलर “They Call Him OG” चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली असली, तरी शनिवारी म्हणजेच तिसऱ्या दिवशी कमाईत थोडी घसरण पाहायला मिळाली. मात्र या मंदावलेल्या गतीनंतरही, चित्रपटाने जगभरात 200 कोटींचा टप्पा सहज पार केला आहे.
सोशल मीडियावर पवन कल्याणच्या लूक आणि परफॉर्मन्सबद्दल जोरदार चर्चा सुरूआहे. चित्रपटाभोवतीचं प्रचार, चर्चा आणि फॅन बेसचा सपोर्ट अजूनही मजबूत आहे. त्यामुळे चित्रपट पुन्हा एकदा कमाईत उडी घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चित्रपटासाठी जरी समीक्षकांकडून मिश्र प्रतिक्रिया मिळाल्या, तरी पवन कल्याणचा स्टारडम आणि चाहत्यांचा सपोर्ट यामुळे चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.
मोठी घोषणा अन् चेंगराचेंगरी, ३३ लोकांचा मृत्यू,अनेक बेपत्ता; थलापती विजयच्या रॅलीत झालं तरी काय?
या चित्रपटात इमरान हाश्मीने पहिल्यांदाच तेलुगू सिनेमात प्रवेश केला आहे. चित्रपटात त्याने ‘ओमी भाऊ’ या क्रूर, निर्दयी आणि प्रभावी खलनायकाची भूमिका साकारली आहे, जो पवन कल्याणच्या पात्र ओजस घंभीर (OG) चा प्रमुख शत्रू आहे. इमरान हाश्मीने यापूर्वी अनेक गडद आणि भावनिक व्यक्तिरेखा बॉलिवूडमध्ये साकारल्या आहेत, परंतु ‘OG’ मधील ही भूमिका दाक्षिणात्य अॅक्शन सिनेमातील त्याचा पहिलाच अनुभव आहे. तेलुगू भाषेत डायलॉग डबिंग किंवा स्वत:ची तयारी यामध्येही त्याने विशेष मेहनत घेतल्याची माहिती समोर आली आहे.