फोटो सौजन्य - Social Media
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ‘आई तुळजाभवानी’ धुम्रासुराचा वध करणार आहे. ‘कलर्स मराठी’वर सुरू झालेली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली आहे. देवी तुळजाभवानीची महागाथा प्रेक्षकांच्या मनात भक्ती आणि श्रद्धा जागवणारी ठरली आहे. या मालिकेच्या पहिल्या काही भागांतच देवी पार्वतीने तुळजाभवानीचं रूप धारण करून भूतलावर अवतार घेतला, भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि असूरांचा नाश करण्यासाठी देवीने अवतार घेतला आहे. मालिकेचा पहिलाच भाग प्रेक्षकांना फार आवडला आहे.
हे देखील वाचा : संघर्षमय प्रेमाची नादमय कथा; ‘नाद – द हार्ड लव्ह’ चा अॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज
मालिकेत दाखवण्यात आलं की वक्रासुर नावाच्या असूराचा वध करून देवीने तिच्या भक्तांना त्रासातून सोडवलं. फक्त भक्तांचं रक्षणच नाही तर कर्दम ऋषींच्या पत्नी अनुभूतीला सती जाण्यापासून वाचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य देखील देवीने केलं. या प्रसंगाने देवीच्या दिव्य रूपाचं दर्शन प्रेक्षकांना घडवलं आणि त्यांच्या मनात विश्वासाचं आणि भक्तीचं बीज पेरलं.
आता मालिकेत आणखी एक महत्त्वपूर्ण प्रसंग उलगडणार आहे, ज्यात देवी धुम्रासुरासोबत लढणार आहे. दैत्य माता दीतीने धुम्रासुराला आश्रमात पाठवण्याची युक्ती केली आहे, कारण ती शिवशक्ती एकत्र येऊ नये असं पाहत आहे. धुम्रासुर हा एक मायावी दैत्य आहे जो लोकांच्या स्वप्नांमध्ये शिरून त्यांना जखमा करतो. या जखमा प्रत्यक्ष शरीरावर उमटतात आणि त्या व्यक्तीचं मरण ओढवतात. यामुळे या असूराचं पराभव करणं अवघड आहे.
महादेव या परिस्थितीला गांभीर्याने पाहत आहेत, मात्र नारदमुनींनी सूचित केल्याप्रमाणे, देवीला या युद्धात कोणत्याही मदतीची गरज नाही असं वाटतं. त्यामुळे महादेव कैलासावरच थांबतात. आता धुम्रासुराचा पराभव कसा होईल आणि देवी तुळजाभवानी कशा प्रकारे या संकटाचा सामना करेल, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहणं आवश्यक आहे. दररोज रात्री 9 वाजता ‘आई तुळजाभवानी’ फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioCinema वर पाहता येईल.