डोळ्यात अंजन घालणाऱ्या 'निबार'चा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, शिक्षणासह समाजव्यवस्था घटकावर करणार भाष्य
पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून ‘निबार’ या आगामी मराठी चित्रपटाबाबत रसिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याच वातावरणात प्रदर्शित झालेल्या ‘निबार’च्या ट्रेलरनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. ‘निबार’ हा मनोरंजनासोबतच एक महत्त्वपूर्ण संदेश देणारा चित्रपट असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते. १३ जूनपासून ‘निबार’ संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
ध्रुव फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली निर्माते संतोष भणगे, अनिकेत माळी आणि भरत सावंत यांनी ‘निबार’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे सहनिर्माते जितेंद्र भास्कर ठाकरे असून, दिग्दर्शनाची जबबदारी सुनील शिंदे यांनी सांभाळली आहे. ‘निबार’ हा चित्रपट शाळाबाह्य मुलांची कथा सांगणार असल्याचे ट्रेलर पाहताच जाणवते. यातील शशांक केतकरने साकारलेली शिक्षकाची व्यक्तिरेखा मनाला भावणारी आहे. मूल जन्माला येताच प्रत्येक आई-वडील त्याच्या भवितव्याबाबत विचार करू लागतात. त्याला सर्वोत्तम शाळेत दाखल करून शिक्षीत करण्याकडे त्यांचा कल असतो, पण जगात असेही काही आई-वडील आहेत, जे मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी त्यांच्याकडे कमाईचे साधन म्हणून पाहतात.
अशाच शाळेत न जाणाऱ्या मुलांची गोष्ट ‘निबार’मध्ये पाहायला मिळणार असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर जाणवते. या चित्रपटात पाच मुले मुख्य भूमिकेत असून, शशांक केतकरने साकारलेला शिक्षक लक्ष वेधून घेतो. शशांकला सायली संजीवने सुरेख साथ दिली आहे. चित्रपटातील गीत-संगीत मनाला भिडणारे असून, छायालेखन आणि वास्तवदर्शी लोकेशन्स कथानकाला अचूक न्याय देणारे आहे. दिग्गज कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आणि कुशल दिग्दर्शन ‘निबार’च्या जमेची बाजू असल्याचे ट्रेलर पाहिल्यावर समजते. प्रदर्शित करण्यात आलेला ट्रेलर खऱ्या अर्थाने चित्रपटाची झलक दाखवणारा असून, चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार याबाबतची उत्सुकता जागवणारा आहे.
भारतीयांनी ज्या देशाला ‘बॉयकॉट’ केलं त्याची ब्रँड ॲम्बेसिडर बनली कॅटरिना कैफ…
शशांक केतकर, सायली संजीव, शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, अरुण नलावडे, शांता तांबे, राजेश दुर्गे, अनिकेत माळी आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. ‘निबार’ची पटकथा व संवादलेखन राजेश दुर्गे आणि सुनिल शिंदे यांनी केले आहे. छायालेखन धनंजय कुलकर्णी यांनी, तर संकलन सुनिल जाधव यांनी केले आहे. गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतरचनांना संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत दिले असून, पार्श्वसंगीताची जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. आदर्श शिंदे तसेच रोहित राऊत या मराठी रसिकांच्या आवडत्या गायकांनी या चित्रपटातील गीते गायली आहेत. सतिश बिडकर यांनी कला दिग्दर्शन केले असून, साऊंड डिझाईन अभिजीत देव यांनी केले आहे. शिरीष राणे कास्टिंग व लाईन प्रोड्युसर, तर अमोल गायकवाड कार्यकारी निर्माते आहेत.