
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
१९व्या शतकातील भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित ही पॅन-इंडिया चित्रपट खरी ऐतिहासिक घटनांवर प्रेरित आहे. हा चित्रपट विजय देवरकोंडा आणि मायथ्री मूव्ही मेकर्स यांची तिसरी संयुक्त निर्मिती ठरणार असून, यापूर्वी त्यांनी ‘डिअर कॉम्रेड’ आणि ‘खुशी’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचं संगीत आयकॉनिक संगीतकार जोडी अजय–अतुल यांनी दिलं असून, त्यांच्या दमदार संगीतामुळे चित्रपटाला आणखी भव्यता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पॅन-इंडिया सिनेमा विश्वातील सर्वात टॅलेंटेड कलाकारांपैकी एक असलेला विजय देवरकोंडा नेहमीच आपल्या प्रोजेक्ट्समधून चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करत असतो. दमदार स्क्रीन प्रेझेन्स आणि प्रभावी अभिनयामुळे प्रत्येक चित्रपटात वेगळी छाप पाडणारा विजय आता राहुल सांकृत्यायन दिग्दर्शित VD14 या भव्य चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.
कित्येक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आणि वाढलेल्या उत्साहाच्या पार्श्वभूमीवर, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मेकर्सनी चित्रपटाचं टायटल आणि रिलीज डेटसह एक दमदार ग्लिम्प्स शेअर केला. चित्रपटाचं नाव ‘राणा बाली’ असून, यात विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ११ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
‘राणा बाली’ची कथा १९व्या शतकात घडते आणि १८५४ ते १८७८ दरम्यान घडलेल्या वास्तविक ऐतिहासिक घटनांपासून प्रेरित आहे. हा चित्रपट मोठ्या स्तरावर पॅन-इंडिया प्रोजेक्ट म्हणून साकारला जात आहे. ग्लिम्प्समध्ये “कर्स्ड लँड” आणि त्याच्या नायकाची ओळख करून देण्यापूर्वी, भारतावरील ब्रिटिश राजवटीची क्रूरता प्रभावी व्हिज्युअल्स आणि ताकदवान कथानकातून मांडण्यात आली आहे.
राहुल सांकृत्यायन यांच्या नरेशनमधून वसाहतवादी धोरणांमुळे देशावर कसा अन्याय झाला, विशेषतः सर रिचर्ड टेम्पल आणि सर थियोडोर हेक्टर यांच्या कार्यकाळात काही भागांना जाणीवपूर्वक दुष्काळात कसं ढकलण्यात आलं, हे ठळकपणे दाखवण्यात आलं आहे. ग्लिम्प्समध्ये हिटलरच्या होलोकॉस्टपेक्षाही भीषण नरसंहाराची तुलना करत भारतावर झालेल्या प्रचंड आर्थिक शोषणावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
विजय देवरकोंडा ‘राणा बाली’ या भूमिकेत एका नव्या, रग्गड आणि प्रभावी लूकमध्ये दिसत असून त्याची उपस्थिती अत्यंत ताकदवान वाटते. रश्मिका मंदाना ‘जयम्मा’च्या भूमिकेत झळकणार आहे. तर खलनायक सर थियोडोर हेक्टरच्या भूमिकेत आर्नोल्ड वॉसलूची एंट्री चित्रपटाची ताकद आणखी वाढवते.
गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेडनंतर विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना ही लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडी पुन्हा एकदा ‘राणा बाली’मध्ये एकत्र दिसणार आहे. हा चित्रपट विजय आणि मायथ्री मूव्ही मेकर्स (नवीन येरनेनी आणि वाय. रवि शंकर) यांचा तिसरा संयुक्त प्रोजेक्ट आहे. जे पुष्पासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी ओळखले जातात. तसेच, टॅक्सीवालाच्या यशस्वी दिग्दर्शक राहुल सांकृत्यायनसोबत विजय पुन्हा एकदा काम करत आहे.
टी-सीरिजकडून सादर करण्यात येणाऱ्या या भव्य चित्रपटाला अजय–अतुल यांच्या संगीताची साथ लाभली असून, त्यामुळे ‘राणा बाली’चा भव्यपणा आणि प्रभाव आणखी वाढणार आहे.