पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची तब्येत खालावल्याची माहिती नुकतीच समोर आली होती. विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील (Pune) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरु होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी मंगेशकर रुग्णालयात आज वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
‘माहेरची साडी’ चित्रपटात अलका कुबल यांचा ‘निर्दयी बाबा’ आणि ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात ‘ऐश्वर्या राय बच्चन’च्या प्रेमळ बाबांची भूमिका साकारणाऱ्या हरहुन्नरी कलावंताने आज जीवनाच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेतली आहे.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी ६ च्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विक्रम गोखले यांनी आजवर रंगभूमी, टेलिव्हिजन आणि चित्रपट अशा सर्व व्यासपीठांवर दमदार भूमिका केल्या. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही (Hindi Movies) नाव कमावलं आहे. सध्या ते स्टार प्रवाह (Star Pravaah) वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत भूमिका साकारत होते. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘गोदावरी’ या चित्रपटातही विक्रम गोखले यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.
या चित्रपटात जितेंद्र जोशी, नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे यांच्यासोबत त्यांनी काम केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या आधीही ते रुग्णालयात दाखल होते. डिस्चार्ज मिळताच त्यांनी शूटिंगला सुरुवातही केली होती.
१९९० मध्ये अमिताभ बच्चन अभिनीत अग्निपथ आणि १९९९ मध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन अभिनीत हम दिल दे चुके सनम या चित्रपटांचाही समावेश आहे.