समुद्राच्या आत वसलंय हैराण करणारं जादुई जग, कॅनकुनचे Musa Museum जिथे मुर्त्या पाण्यात श्वास घेतात
MUSA हे संग्रहालय समुद्राच्या खोल भागात वसलेलं असून, इथे ५०० हून अधिक भव्य शिल्पं मांडलेली आहेत. या शिल्पांच्या माध्यमातून मानवी भावना, सामाजिक विषय आणि सागरी जीवन यांचे प्रतिबिंब दाखवले गेले आहे. पाहणाऱ्याला क्षणभर वाटतं की ही शिल्पं जणू काही समुद्राशी संवाद साधत आहेत, श्वास घेत आहेत.
या संग्रहालयाची स्थापना २००९ मध्ये पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने करण्यात आली. समुद्रातील प्रवाळ खडकांचे संरक्षण करणे आणि सागरी जीवसृष्टीसाठी नवीन अधिवास तयार करणे हे या मागील प्रमुख उद्दिष्ट होते. हे शिल्प विशिष्ट नैसर्गिक मटेरियलपासून बनवले गेले आहेत, जे कोरल आणि सागरी प्राण्यांसाठी सुरक्षित व पोषक आहेत.
या अद्वितीय कलाकृतींचे श्रेय ब्रिटिश कलाकार जेसन डीकेयर्स टेलर यांच्यासह अनेक कलाकारांना जाते. त्यांनी या शिल्पांमधून मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंध, समाजातील विविध पैलू आणि पर्यावरणाविषयी जागरूकता या विषयांवर भाष्य केले आहे.
MUSA ला भेट देण्यासाठी पारंपरिक संग्रहालयात फिरावं लागत नाही. पर्यटक येथे डायव्हिंग, स्नॉर्कलिंग किंवा काचेच्या तळाच्या बोटीने ही कलाकृती जवळून पाहू शकतात. पाण्यावर सूर्यकिरण झळकताना, समुद्राच्या लाटा शिल्पांवर आदळताना निर्माण होणारं दृश्य इतकं मंत्रमुग्ध करणारं असतं की ते अनुभवणं हे प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरतं.
MUSA हे केवळ एक कला प्रकल्प नाही, तर हे मानवतेचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा जिवंत पुरावा आहे. सर्जनशीलता, शाश्वतता आणि पर्यावरण रक्षण यांचं हे एक विलक्षण उदाहरण आहे. कॅनकुनला भेट देणारा प्रत्येक पर्यटक या अद्भुत संग्रहालयाच्या अनुभवातून शांततेची आणि प्रेरणाची भावना घेऊन परततो.