शाही दागिन्यांपेक्षाही महाग! भारतातील 'या' ५ साड्यांची किंमत ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल आश्चर्यकारक धक्का
भारतातील तमिळनाडू राज्यातील कांचीपुरम येथील प्रसिद्ध रेशमी साडी केवळ भारतात नाहीतर संपूर्ण जगभरात फेमस आहे. १००% शुद्ध तुतीच्या रेशमाचा वापर करून बनवलेली साडी लग्नकार्य, सणसमारंभ आणि विशेष सोहळ्यांमध्ये नेसली जाते. कांजीवरम सिल्क साडीला तामिळनाडूसह भारतात सुद्धा मोठी मागणी आहे. कांजीवरम साडीची किंमत ₹२,५०० पासून ते ६ लाख रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त आहे.
महाराष्ट्राची शान असलेली पैठणी साडी पूर्णपणे हाताने विणली जाते. अस्सल पैठणी साडीची उलटी आणि सुलटी बाजू एकसारखीच दिसते. पैठणी साडीच्या काठावर मोर, पोपट, वेगवेगळी फुलांची डिझाईन सोन्या-चांदीच्या जरीने विणकाम करून तयार केली जाते. महाराष्ट्रामध्ये पैठणी साडी विणण्याची कला २०० वर्ष जुनी आहे. अस्सल पैठणी साडीची किंमत २० हजारांपासून ते ५ लाखाहून जास्त आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात तयार होणाऱ्या बनारसी साडीला भारतासह जगभरात मोठी मागणी आहे. ही साडी उच्च दर्जाचे सिल्क वापरून तयार केली जाते. साडीवर फुले, पाने आणि दाट विणकाम करून तयार केलेली मुगल शैलीची झलक सुद्धा पाहायला मिळते. लग्न सोहळ्यात प्रामुख्याने बनारसी सिल्क साडी नेसली जाते.
गुजरातमधील पटोला सिल्क साडी क्लिष्ट विणकामामुळे प्रसिद्ध आहे. पटोला साडी डबल इकत तंत्रज्ञान वापरून विणली जाते. या साडीच्या विणकाम कलेला सुमारे ८०० ते ९०० वर्षांचा जुना इतिहास लाभला आहे. पूर्वीच्या काळी पटोला साडी फक्त राजे-महाराजे आणि खानदानी कुटुंबातील महिलांचं वापरत होत्या. या साडीची किंमत साधारणता दीड लाखांपासून ते १० लाख रुपयांपर्यंत आहे.
कर्नाटक राज्याची ओळख असलेली म्हैसूर सिल्क साडी उच्च दर्जाच्या शुद्ध रेशमी धाग्यांसाठी, हलक्या वजनासाठी आणि चमकदारसाठी केवळ भारतातच नाहीतर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. ही साडी विणण्यासाठी शुद्ध रेशीम आणि शुद्ध सोन्या-चांदीच्या जरीचा वापर केला जातो. म्हैसूर सिल्क साडीची किंमत तिच्या गुणवत्तेवर ठरते.