प्रत्येक स्वयंपाक घरात वेगवेगळे पदार्थ कायमच उपलब्ध असतात. त्यातील पौष्टिक पदार्थ म्हणजे तीळ. जेवण बनवताना पांढऱ्या किंवा काळ्या तिळांचा आवर्जून वापर केला जातो. तिळाचे सेवन केल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये कॅल्शियम. फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक आढळून येतात. मागील अनेक वर्षानूपासून पांढऱ्या आणि काळ्या तिळाचा वापर औषध म्हणून केला जात आहे. गंभीर आजारांपासून लढण्यासाठी तिळाचे सेवन करावे.चला तर जाणून घेऊया तीळ खाण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असलेले तीळ नियमित खाल्ल्यास शरीराला मिळेल भरपूर पोषण, हाडे राहतील मजबूत

तीळ कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहेत. मजबूत हाडे आणि दातांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. नियमितपणे तीळ खाल्ल्यास हाडे मजबूत राहण्यास मदत होते आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या समस्यांचा धोका कमी होतो.

तिळामध्ये पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी ॲसिड आणि सेसामोलिन युक्त घटक असतात, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. वाढते कोलेस्ट्रॉल आणि शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यासाठी तिळाचा आहारात समावेश करावा.

तिळामध्ये खूप जास्त फायबर असते. फायबर युक्त पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राहते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

तिळाचे तेल केसांसाठी अमृता समान मानले जाते. केसांमध्ये वाढलेला कोरडेपणा आणि केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तिळाचे तेल केसांवर लावून मसाज करावा.

तिळामध्ये चांगल्या प्रमाणात मॅग्नेशियम असते, ज्यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहते. झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पांढरे तीळ खावेत.






