
‘भरत गोगावले पालकमंत्री झाले तरी..,’, रायगडच्या पालकमंत्रीपदावर आदिती तटकरेंचं मोठं विधान
महायुती सरकारमध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या चर्चांदरम्यान मंत्री आदिती तटकरेंनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, या पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोपवण्यात आला असून, कोणताही निर्णय स्वीकारण्याची तयारी आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या की, भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली तरी त्यांना मनापासून शुभेच्छा असतील. जिल्ह्याच्या विकासासाठी दोन्ही मंत्री मिळून काम करणे अधिक महत्त्वाचे असून पदापेक्षा विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोनम वांगचुक प्रकरणावर सुषमा अंधारे आक्रमक; ‘सरकार पुरस्कृत गुंड’ म्हणत भाजप आणि पोलिसांवर निशाणा
रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या, “तो निर्णय आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे ठेवलेला आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद मिळालं तरी माझ्या त्यांना शुभेच्छाच राहतील. याआधी सुद्धा मी म्हटलेलं आहे. शेवटी माच्या सगळ्यांसाठी जिल्हा आणि जिल्ह्याचा विकास हा अधिक महत्वाचा आहे. त्या दृष्टिकोनातुन काम करत असताना पालकमंत्री हे फक्त एक पद झालं, पण आज दोन मंत्री जिल्ह्यांमध्ये आहेत. दोन्ही मंत्र्यांच्या माध्यमातून जिल्हा पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातू आम्ही काम केलं पाहिजे, या बाबीकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून मी अधिक प्रमाणात लक्ष देत आहे.”
लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांना वगळल्याच्या विरोधकांच्या आरोपांवरही आदिती तटकरेंनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, अनेक अर्जांमध्ये ई-केवायसी अपूर्ण असणे, कागदपत्रांतील तफावत, तसेच उत्पन्न आणि वाहनांच्या निकषांमुळे काही अर्ज अपात्र ठरले आहेत.
तटकरे यांनी सांगितले की, राज्यातील सर्व डीबीटी केंद्रांना ई-केवायसी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पात्र महिलांना लाडकी बहीण योजना किंवा संजय गांधी निराधार योजनेपैकी किमान एका योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा त्यांनी दावा केला.
त्यांनी स्पष्ट केले की, कोणत्याही पात्र महिलेला जाणूनबुजून वगळले जात नसून लाभार्थ्यांची माहिती अचूक करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबवली जात आहे. सरकारचे उद्दिष्ट अधिकाधिक पात्र महिलांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्याचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.