'अजितदादांनंतर जयंत पाटीलच अर्थखातं सांभाळू शकतात, पण..,' सुषमा अंधारेंचं मोठं विधान
राज्यात अर्थखात्याबाबतच्या चर्चांना वेग आला असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांना अर्थखात्याची जबाबदारी मिळण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी त्यांच्या प्रशासकीय क्षमतेचे कौतुक केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “पक्ष कोणताही असो, अजित पवारांनी अर्थखातं अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळलं. त्यांच्या नंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटील यांच्यात आहे. मात्र, जयंत पाटील आमच्यासोबत आहेत.”
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याबाबत त्या म्हणाल्या की, “ते भाजपच्या नेत्याला नव्हे, तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते. त्या भेटीचं कारण त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे.”
सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत, त्यांच्या विविध वक्तव्यांमध्ये विसंगती असल्याचा आरोप केला. तसेच, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाबाबतही भाष्य करत, त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न झाला पण तो यशस्वी ठरला नसल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यात सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांवर अंधारे यांनी थेट भाष्य केले नसले तरी, जयंत पाटील यांच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केला. दरम्यान, काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या भाजप नेत्यांसोबतच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. याला काही काही तास उलटत नाहीत तोच ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. विशेषतः, संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात जयंत पाटील यांना महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, याची चर्चा सुरू आहे. पण जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पुष्टी करण्यात आलेली नाही. सध्या या संदर्भात फक्त राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कच काढले जात आहे.






