aditya thackeray target eknath shinde on kunal kamra controversy
मुंबई : राज्यामध्ये कुणाल कामरा याच्या कवितेवरुन राजकारण रंगले आहे. कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त कविता केली. यामध्ये त्यांने राजकारण आणि शिंदेंचे बंड यावरुन जोरदार टोला लगावला. एका कवितेच्या स्वरुपात सादर केलेल्या या टीकेवर शिंदे गट आक्रमक झाला. कुणाल कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. यामुळे हे प्रकरण आणखी तापले. कुणाल कामरा याच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गट पुढे आला आहे.
कॉमेडियन कुणाल कामरा याने कविता सादर केल्यानंतर त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कामरा याच्यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र त्याला पाठिंबा देण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहेत. तसेच सुषमा अंधारे यांनी कुणाल कामरा याची कविता त्याच तालासुरात पुन्हा एकदा गायली आहे. याचबरोबर आता ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदेंवर निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आदित्य ठाकरे यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुणाल कामरा या प्रकरणावरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले की, कुणाल कामराचा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याची कविता बघितली मात्र त्याच्यामध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांचे नाव त्यांनी घेतलेलं नाही. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं का की त्यांचं नाव गद्दार आहे. त्यांना मिरची का झोंबली? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
ते पुढे म्हणाले की, त्यांच्या खासदारांची प्रतिक्रिया मी ऐकली. ते आपल्या नेत्याला साप म्हणतात. एकनाथ शिंदे यांना साप म्हणणारे ते खासदार आहेत. दोन्ही बाजूने विचार केला तर कोण चुकून बरोबर याची चौकशी होईल, पण जर नाव न घेता मिरची झोंबत असेल तर त्यांनी स्वतःला ते नाव दिलं आहे का? कार्यक्रम कधीही होऊ द्या, त्या कार्यक्रमांमध्ये कुठेही एकनाथ शिंदे यांचे नाव नाही, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस म्हणत असतील माफी त्यांनी मागितली पाहिजे पण माफी कोणाची मागायची? गद्दारांची… कारण त्यात फक्त गद्दार नाव घेतलं आहे बाकी कोणाचं नाव घेतलेलं नाही. संविधान लाल आणि कोणत्या रंगाचे या रंगाचा खेळ भाजपने बंद करावा. आज रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या घोटाळ्या संदर्भात बैठक आहे. त्या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे मी सगळ्यात आधीपासून मागणी केली आहे की या रस्त्यामध्ये घोटाळा झाला आहे आणि त्याची यु ओ डब्लू कडून चौकशी व्हावी,” अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.