पाथर्डी प्रतिनिधी : मतदान केंद्राची पाहणी करण्यासाठी गेलेल्या आमदार मोनिका राजळे यांच्यावर शिरसाटवाडी येथे जमावाकडून हल्ला होऊन घोषणाबाजी करण्यात आली. दगडफेकी मध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली असून दोन पोलीस कर्मचारी व सुरक्षारक्षकही किरकोळ जखमी झाले आहेत आमदार राजळे यांना मतदान केंद्रामध्ये सुमारे तीन तास ग्रामस्थांनी बसवून ठेवले होते.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आमदार मोनिका राजळे व त्यांचे एक दोन सहकारी सुरक्षारक्षक यांना बाळासाहेब शिरसाट यांचा निरोप आला होता. त्यानंतर आमदार राजळे या मतदान केंद्र पाहणीसाठी तेथे गेल्या होत्या. राजळे गाडीतून उतरतानाच “प्रताप काका जिंदाबाद” “खासदार नवा आमदार नवा” अशा घोषणा जमावाकडून सुरू झाल्या. याकडे दुर्लक्ष करत आमदार राजळे मतदान केंद्रात गेल्या .तेथील कार्यकर्त्यांनी त्यांना तुम्ही बाहेर निघा आपण मते वाटून घेऊ, तुमचे कार्यकर्ता प्रतिनिधी ओळखपत्र चुकीचे आहे, अशा स्वरूपाची विचारणा केली. मात्र तेथील तणावाची परिस्थिती बघत आमदार राजळे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले.
मतदान केंद्राबाहेर येताच दोन-तीन दगड आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दिशेने जमावाकडून भिरकावण्यात आले. त्यातील काही दगडे लागून राजळेंचे कार्यकर्ते जखमी झाले. राजळे पुन्हा मतदान केंद्रात गेल्या बाहेर जमाव घोषणा देत होता. मतदान केंद्रामध्ये मतदानाला जाण्यासाठी आलेल्या चार-पाच महिला सुद्धा अडकून पडल्या. आमदारांनी पोलिसांना फोन करताच काही वेळाने पोलीस शिरसाटवाडी येथे दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य बघत त्यांनी आमदारांना संरक्षण देत वाढीव बंदोबस्त तैनात केला. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर गावाबाहेर आमदार समर्थकांचा जमाव घोषणा देत होता. त्याचबरोबर आमदार विरोधी जमा गावांमध्ये घोषणा देत होता. अत्यंत तणावाच्या वातावरणात पोलिसांनी आमदारांना जुन्या शिरसटवाडी रस्ता मार्गे सुरक्षित आणले. मात्र ठिकठिकाणी शहरात संतप्त कार्यकर्ते प्रतिकारासाठी उभे होते.मतदार संघातील शिंगोरी, अकोले, भारजवाडी अशा ठिकाणी सुद्धा अस्थिर वातावरण असल्याच्या कार्यकर्त्यांच्या निरोपामुळे आमदारांनी तेथे भेट दिली. पाथर्डी शहर व तालुक्यात अत्यंत तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी तातडीने जमावबंदी आदेश जारी केला.
दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलीस उपाधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यासह सुमारे 100 पोलिसांचा फौज फाटा पाथर्डी शिरसाटवाडी व आमदारांच्या शहरातील निवासस्थानाभोवती तैनात करण्यात आला. याबाबत आमदार मोनिका राजळे यांच्याशी चर्चा केली.भावनेच्या भरात तरुणांकडून घडलेले कृत्य निषेधार्ह असले तरीही त्यांच्या आयुष्याचा विचार करता कुठलीही कायदेशीर कारवाई आपल्याला करायची नाही. राजळे कुटुंबाचे सर्व जाती-धर्माच्या लोकांची अत्यंत सलोख्याचे व कौटुंबिक वातावरणाचे संबंध आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे तणाव न बाळगता सर्व कार्यकर्त्यांनी शांतता राखावी असे मोनिका राजळे यांनी सांगितले.






