PCMC Municipal Elections: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नाहीत. पण तरीही सर्व राजकीय पक्षांनी महापालिका निवडणकांची तयारी सुरू केली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच सक्रीय झाली आहे. या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी (१७ जून) पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार व शरद पवार यांच्या स्वतंत्र सभा होणार आहेत. त्यामुळे या संभाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काका व पुतण्याच्या भाषणात काय घडते, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक प्रशासनालाही महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. प्रभाग रचनेचे हे कामही सध्या अंतिम टप्प्यात असून, दिवाळीपूर्वी निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार मैदानात उतरले असून, माजी नगरसेवकही पुन्हा सक्रिय झाले आहेत.
फेब्रुवारी 2017 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ता गमावलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला काबीज करण्यासाठी सज्ज झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मोहिमेचे नेतृत्व हाती घेतले असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार यांच्या गटात गेलेले स्थायी समितीचे माजी सभापती अजित गव्हाणे यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांनी पुन्हा अजित पवारांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी १७ जूनला भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात अजित पवार काय भूमिका मांडतात, याकडे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ! 7 वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न; आरडाओरडा केल्याने डाव फसला…
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी स्वतंत्र शक्तिप्रदर्शनाची तयारी केली आहे. येत्या मंगळवारी (दि. १७ जून) काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांचे स्वतंत्र कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्यात आले आहेत.
शरद पवार गटाचा मेळावा ताथवडे येथील एका हॉटेलमध्ये पार पडणार असून, त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आम आदमी पार्टीचे काही स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या मेळाव्यात खासदार शरद पवार कार्यकर्त्यांना काय संदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे हेही उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दुसऱ्या गटाचा मेळावा होणार आहे. त्यामुळे एकाच दिवशी दोन्ही गट रस्त्यावर उतरणार आहेत. कोणत्या गटाकडे किती ताकद आहे, हे या मेळाव्यांमधून स्पष्ट होईल, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, जसजशी निवडणूक जवळ येईल, तसतसे कार्यकर्त्यांमध्ये चुरस आणि संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.