संतप्त शेतकरी पेट्रोल घेऊन थेट भाजप आमदाराच्या घरात घुसला
Buldhana News: राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. मे महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा भरपाई अद्याप न मिळाल्याने, खरीप हंगाम सुरू होत असताना पुन्हा पावसाच्या व्यत्ययामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सरकारी मदतीसाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत असून, या असंतोषाचे पडसाद आता थेट लोकप्रतिनिधींवर उमटताना दिसत आहेत. अशातच बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे भाजपचे आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानी पेट्रोल घेऊन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावातील विशाल मुरुड या शेतकऱ्याने गुरुवारी मध्यरात्री हा प्रकार केला. विशाल मुरुड हा पेट्रोलचा कॅन घेऊन आमदारांच्या बंगल्याच्या दिशेने जात असताना “माझ्या शेतीचे अतिवृष्टीने नुकसान झाले, मोबदला मिळत नाही, त्यामुळे बंगला पेटवणार,” असे ओरडत होता. त्यावेळी आमदार कुटे यांच्या स्वीय सहाय्यकाने प्रसंगावधान राखून त्याला अडवले आणि तत्काळ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी BNS कलम 333 आणि 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, जळगाव जामोद पोलीस अधिक तपास करत आहेत. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने तो संतप्त झाला होता. हातात पेट्रोलचा कॅन घेऊन तो आमदारांच्या बंगल्यावर गेला आणि ओरडू लागला, “माझं नुकसान भरून मिळालं नाही, त्यामुळे मी हा बंगला पेटवणार!” असे ओरडत त्याने संताप व्यक्त केला.
एकीकडे अमरावतीमध्ये आमदार बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत, तर पुण्यात त्यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. संजय कुटे हे २००४ पासून सलग विधानसभेवर निवडून येत आलेले भाजपचे विश्वासू नेते असून, या घटनेमुळे राज्य सरकारसमोरचा दबाव अधिकच वाढला आहे. शासनाने वेळीच उपाययोजना न केल्यास, शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर आणखी तीव्र स्वरूपात व्यक्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे
आधी दिली धमकी; पेट्रोल घेऊन शेतकरी शिरला आमदाराच्या घरात, काळजाचा ठोकाच चुकला; काय घडलं पहा?
विशाल सुधाकर मुरुड यांनी 2024 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यानंतर तहसील कार्यालयात वेळोवेळी कागदपत्रे सादर केली होती. केवायसी पूर्ण करूनही भरपाई मिळाली नाही, यामुळे त्यांनी समाजमाध्यमांवर “तृप्ती व्हिला” (कुटे यांचे निवासस्थान) जाळून टाकण्याची धमकी दिली होती.
काल रात्री विशाल मुरुड यांनी प्रत्यक्ष निवासस्थानी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र संजय कुटे यांच्या स्वीय सहायकाने समयसूचकता दाखवत त्यांना अडवले आणि पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी BNS कलम 333 व 351(2) नुसार गुन्हा दाखल करत मुरुख यांना अटक केली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या न्यायप्राप्तीच्या समस्येसोबतच लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.