
Ajit Pawar statement on forming an alliance with Sharad Pawar NCP Politics
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. यावेळी शरद पवारांसोबत केलेल्या युतीबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. तसेच अजित पवार हे पुन्हा एकदा पूर्ण राष्ट्रवादीमध्ये दिसणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवारांनी दिलेले उत्तर हे चर्चेचा विषय ठरला आहे. अजित पवार म्हणाले की, . मी या विषयावर आताच भाष्य करणार नाही. राज्याचे बजेट आणि त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका पार पडू द्या, मगच मी यावर सविस्तर बोलेन, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
हे देखील वाचा : वडिलांच्या विरोधात मुलगा निवडणुकीच्या रिंगणात! बंडखोर पुत्रामुळे भाजपला डोकेदुखी
पुढे अजित पवार म्हणाले की, “सध्या आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जात आहोत. जर आम्ही एकत्र असूनही टोकाची भूमिका घेत राहिलो, तर जनता आम्हाला वेड्यात काढेल. काळानुसार भाषणांमधील तीव्रता कमी होते. मागची भाषणं काढली तर अनेकांनी एकमेकांवर टीका केली आहे, पण आता परिस्थिती बदलली आहे,” असेही अजित पवारांनी सांगितले आहे.
असा कोणताही निर्णय एकट्या अजित पवारचा नसतो
अजित पवार यांनी संधीचे कारण देत शरद पवारांपासून आपला मार्ग वेगळा केला आणि भाजपसोबत युती केली. यानंतर आता पालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने शक्यता वाढल्या आहेत. पुढे जाऊन पुन्हा एकदा शरद पवारांसोबत एकत्र येणार का? असा प्रश्न अजित पवारांना विचारता आला. ते म्हणाले की, “असा कोणताही निर्णय एकट्या अजित पवारचा नसतो. आमच्यासोबत असलेले आमदार, नेते आणि कार्यकर्ते या सर्वांच्या सद्सदविवेकबुद्धीला स्मरून आणि सर्वांशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल,” असे सूचक वक्तव्य अजित पवारांनी केले आहे.
हे देखील वाचा : अंबरनाथमध्ये रात्रीस खेळ चाले..! अखेर ‘त्या’ 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या युतीला स्पष्टपणे नकार दिलेला नाही यामुळे शक्यतांना वाव मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या शक्यतेवर अजित पवार यांनी खोचक उत्तर दिले. आत्या बाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं का? ही म्हण वापरत त्यांनी सध्या असा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी सूचित केले. सध्या आमचं पूर्ण लक्ष केवळ महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर आहे. गेल्या नऊ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या का? त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे,” असे देखील मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केले आहे.