
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? भरत गोगावले यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; CM होण्यासाठी त्यांनी...
पुणे : राज ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं अमित ठाकरे यांनी पुण्यात गणपतीला घातलं आहे. त्यामुळे राज ठाकरे मुख्यमंत्री होणार का? यावरून राज्यात चर्चा सुरू आहे. यावरुन आता शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रीया दिली आहे. प्रत्येक मुलाला आपले वडील मुख्यमंत्री व्हावेत, असे वाटते. त्यात अमित ठाकरे यांची काय चूक आहे? मात्र, मुख्यमंत्री होण्यासाठी आवश्यक असलेले १४५ आमदारांचे बहुमत मिळवून दाखवावे,” असे मंत्री भरत गोगावले यांनी म्हटले. ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते.
गोगावले म्हणाले, “पूर्वी त्यांच्याकडे १३ आमदार होते. त्यानंतर एक आमदार राहिला आणि आता आमदारांची संख्या शून्य आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ आमदारांचे बहुमत आवश्यक आहे. ते त्यांनी मिळवून दाखवावे.” काय मागायचे आहे, ते उघडपणे मागितले पाहिजे. आम्ही सुरुवातीला मंत्रीपदाची मागणी केली. त्यानंतर पालकमंत्रीपद मिळाले. आता पुढे काय मागायचे आहे, तेही स्पष्टपणे सांगू, असे गोगावले यांनी सांगितले.
कर्णकर्कश आवाजाबाबतच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले, “पुण्यातूनच याबाबत मागणी झाली होती. आता मुख्यमंत्री यांनीही या विषयाची दखल घेतली आहे. कोणी हयगय केली तर कोणाचीही गय केली जाणार नाही. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा होईल आणि मुख्यमंत्री संबंधितांना ताकीद देतील.”
“मागणारे अनेक जण असतात; मात्र निर्णय घेऊन देणारे आम्ही आहोत. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. सध्या पिके करपत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे,” असेही गोगावले म्हणाले.
आमदारांची नाराजी दूर
आमदारांच्या नाराजीबाबत गोगावले म्हणाले, गणपती दर्शनासाठी आम्ही गेलो होतो. त्यावेळी थोडेफार गैरसमज झाले असतील. त्यात आमदारांचीही काही चूक नाही. पालकमंत्री म्हणून सर्वांना सोबत घेऊन जाणे हे आमचे कर्तव्य आहे. आमदारांची नाराजी आता दूर झाली आहे.
हे सुद्धा वाचा : केतन अग्रवाल हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा! हत्या करून चेतनने ‘मिसळ’ खाल्ली अन्…
लालबागच्या व्हीआयपी दर्शनाबाबत माहिती नाही
लालबागच्या व्हीआयपी दर्शनाबाबत विचारले असता गोगावले म्हणाले, “मला अद्याप याबाबत माहिती नाही. तसे काही झाले असेल तर ते चुकीचे आहे. गर्दीतून पुढे जाताना नेमके काय घडले, याची माहिती घेतल्यानंतरच त्यावर बोलता येईल.