
रोहित पवारांचे डोके ठीक आहे ना? घातपाताचे पुरावे नसताना केवळ संशयाचे धुकेच
ज्या नेत्याचा प्रवासाचा प्लानच आधी ठरलेला नाही, त्याच्या अपघाताचा कट कसा, कोणी व कधी रचला ? याचा कोणताही तर्क रोहित पवारांनी दिलेला नाही. फक्त हवेत संशयाचे धुके पसरवण्याचा कार्यक्रम ते गेले दहा महिने करत आहेत. कटाचे वा घातपाताचे कोणतेही पुरावे सीआयडीला अद्यापी सापडले नाहीत. पण रोहित पवार पुरावे नाहीत हेच मान्य करायला तयार नाहीत. सुरु असणाऱ्या चौकशा संपून तार्किक निष्कर्ष निघण्याची वाट पहायलाही ते तयार नाहीत. अजितदादांच्या कोणाही अनुयायापेक्षा, त्यांच्या पत्नी वा मुलांपेक्षा, त्यांच्या निष्ठावान अनुयायांपेक्षाही मलाच कशी दादांची काळजी आहे, माझ्याच मनात किती प्रेम दाटले आहे, असे रोहित भाऊंना सतत व्यक्त करायचे असते…!
रोहित हे अजितदादांचे पुतणे. दादा हयात असताना त्यांच्या अखेरच्या काही वर्षात सार्वजनिक जीवनात रोहित पवार हे दादांच्या विरोधातच वावरले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रोहित हे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून कडवट टीका करत होते. नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ. तिथून २०१९ नंतर दुसऱ्यांदा रोहित निवडून आले. एकदा विधानसभेत ते काही टीका टिप्पणी करत असताना अजितदादांनी रोहित पवारांना खडसावले होते की, “बेट्या तू कसा निवडून आलास, हे विसरू नको. जर मी कर्जतला येऊन प्रचाराची सभा घेतली असती तर तुझं काय झाले असते तूच सांग…”
मात्र अजितदादांच्या मृत्यु नंतर राजकीय गळे काढण्यात रोहित पवारांनी सर्वांनाच मागे टाकले आहे. दररोज ते अजितदादा पवारांच्या आमदारांना, कार्यकर्त्यांना बजावतात की भाजपा तुमची वाट लावणार आहे. पार्थ व जय पवारांच्यात भाजपा भांडणे लावत आहे… वगैरे वगैरे. दादांचा मृत्यु हा कसा घातपात होता व त्यात दादांचे निकटवर्ती नेते प्रफुल्ल पटेल व सुनिल तटकरे हे कसे दोषी असावेत असले तारे ते प्रत्येक आठवड्यात तोडत आहेत.
गेल्या सोमवारी मुंबईत प्रेस कॉन्फरन्स घेऊन रोहित यांनी अजितदादांच्या अपघाती मृत्युचा थेट संबंध मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी लावण्याचा प्रयत्न केला. कोणताही ठोस पुरावा न देता, एका मोठ्या नेत्यावर असले गलिच्छ आरोप करणाऱ्या व्यक्तीचे डोके तपासलेच पाहिजे असे कोणीही म्हणेल! त्यांच्या बोलण्याचा रोख थेट मुख्यमंत्र्यांकडे होता पण आव मात्र ते असा आणत होते की, “मी काही फडणवीस यांच्यावर आरोप करत नाही. पण फडणवीस हे दादांच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत…”
गेल्या २८ जानेवारी रोजी भल्या सकाळी बारामतीत अजितदादांचे विमान कोसळले. मराठी माणसालाच नव्हे तर देशाला हादरवून टाकणारा तो अपघात होता. काल पर्यंत इतका कामात गढलेला, सर्वत्र संचार करणारा, विकासाचा ध्यास निरंतर बाळगणारा, हसतमुख, जिंदादिल नेता, अचानक दुसऱ्याच दिवशी सकाळी आपल्यातून नाहिसा कसा होतो ? लोकांचा विश्वासच बसत नव्हता. हा अपघात आहे की घातपात अशी शंका अनेकांच्या मनात नक्कीच तरळली.
पण घातपाताचे थोडे तरी सुगावे लागतात. कोणताही गुन्हा लपून राहात नाही. प्राथमिक माहिती हेच दाखवत होती की तो अचानक झालेला अपघातच होता. खरेतर स्वतः शरद पवारांनी त्याच दिवशी दुपारी बारामती विमानतळावर जाऊन पाहाणी केली व निर्वाळा दिला होता की “ कोणी या घटनेचे राजकारण करू नये, हा अपघातच आहे”. पण नंतर रोहीत यांनी जी राळ उडवणे सुरु केले तेंव्हा थोरल्या पवारांनी रोखलेही नाही !
अपघाताच्या आदल्या दिवशीच्या अजितदादांच्या कार्यक्रमांची माहिती घेतली तरी त्यातून हेच दिसते की दुसऱ्या दिवशी विमानाने पुण्याला जायचे हे आधी अजिबात ठरले नव्हते. त्यांचे त्यांनाही रात्री पर्यंत ते ठावूक नव्हते! मुंबईतील बैठका व गाठीभेटीत उशीर होऊ लागला, तेंव्हा दादांनीच त्यांची गाडी व ड्रायव्हर पुढे बारामतीला पाठवून दिले. सकाळी विमानाने बारातमतीला जाऊ हे तेव्हा रात्री ८/९ वाजता त्यांनी ठरवले. त्या नंतरच, दादांच्या कार्यालयातून मंत्रालयातील संबंधित विभागाकडे विमानाची मागणी केली गेली. मध्यरात्रीच्या सुमारास कोणते विमान व त्या विमानाचे पायलट सहाय्यक वगैरे कर्मचारी कोण ते ठरले. ती यादी आल्यावर दादांच्या कार्यालयात म्हटले गेले की “चला ही आपली नेहमीचच टीम आली आहे!” ज्या सुमीत कपूर यांनी २८ जानेवारीला दादांच्या विमानाचे सारथ्य केले, ते पूर्वीही अनेकदा दादांचे विमान घेऊन गेले होते.
ज्या कंपनीवर रोहित पवार आरोप करतात त्यांचीच विमाने अनेकदा दादांच्या दिमतीला असत. इतकेच कशाला घटनेच्या दीड महिना आधी, १० डिसेंबर २०२५ रोजी, नागपूर अधिवेशनासाठी दादा जे विमान व क्रू घेऊन गेले ते हेच होते. त्या वेळी रोहित पवार हेही त्यांच्या समवेत त्याच विमानात सफर करत होते, आता बोला!!
ज्या नेत्याचा प्रवासाचा प्लानच आधी ठरलेला नाही, त्याच्या अपघाताचा कट कसा, कोणी व कधी रचला ? याचा कोणताही तर्क रोहित पवारांनी दिलेला नाही. फक्त हवेत संशयाचे धुके पसरवण्याचा कार्यक्रम ते गेले दहा महिने करत आहेत. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस हे जयपूरला अपघातग्रस्त विमान कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला गेल्याचे जे “मफलरधारी” फोटो रोहित यांनी दाखवले, ते ऑक्टोबर २०२४ मधले आहेत, हे स्वतः रोहितच सांगतात…! एखाद्या उद्योजकाच्या घरच्या लग्नाला नेते जातात यात कट-कारस्थानाचा संशय कसा काय घेता येतो?
रोहित पवार पुरावे नाहीत हेच मान्य करायला तयार नाहीत. सुरु असणाऱ्या चौकशा संपून त्याचा तार्किक निष्कर्ष निघण्याची वाट पहायला ते तयार नाहीत. अजितदादांच्या कोणाही अनुयाया पेक्षा, त्यांच्या पत्नी वा मुलांपेक्षा, त्यांच्या निष्ठावान अनुयायांपेक्षाही मलाच कशी दादांची काळजी आहे, माझ्याच मनात किती प्रेम दाटले आहे, असे त्यांना सतत व्यक्त करायचे असते.
दादांच्या मृत्युची चौकशी तीन स्तरावर सुरु आहे. राज्य सरकारचे सीआयडी, गुप्त पोलीस दल, आणि केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतुक मंत्रालयातील हवाई वाहतुक संचालक, तसेच विमान अपघात तपासणी ब्युरो अशा दोन यंत्रणा चौकशी करत आहेत.
कोणत्याही विमान अपघातानंतर कॉकपिट व्हाईस रेकॉर्डर आणि ब्लॅक बॉक्स अशा दोन उपकरणांची तपासणी हा महत्वाचा दुवा असतो. त्यांतील तांत्रीक माहिती ही आपघाताचे नेमके कारण दर्शवते. विमान अपघाताचा तपास ही बरीच गुंतागुंतीची प्रक्रिया असते. ब्लॅक बॉक्समधील माहिती शोधणे हे जिकीरीचे काम असते व त्यासाठी बरेचदा परदेशी यंत्रणांची मदत घ्यावी लागते. याही प्रकरणात अपघाताने जळालेला व नुकसान झालेला ब्लॅक बॉक्स पूर्ण उलगडा होण्यासाठी परदेशात पाठवला गेला.
विमान अपघाताच्या तपासाचा पूर्ण अहवाल येण्यासाठी तीन ते चार वर्षांचा काळ जावा लागतो. पण अजितदादांच्या संदर्भातील जनभावनेचा क्षोभ आणि राजकीय परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारने वारंवार केलेल्या विनंती नंतर केंद्र सरकारने तपास यंत्रणांना अहवाल त्वरेने तयार करण्यास सांगितले आहे. दादांच्या निधनाच्या वर्षपूर्ती आधी तो अहवाल यावा अशी जाहीर विनंती गृहमंत्री अमित शहांना केली.
विजय कुमार सिंग उर्फ व्ही के सिंग या माजी पायलटने व्हीएसआर व्हेंचर्स ही विमान भाड्याने देणारी (चार्टर) कंपनी सुरु केली. त्यांची सेवा राज्य सरकार कितीतरी वर्षांपासून घेत आहे. अपघातग्रस्त ,“लिअरजेट ४५” प्रकारांच्या या कंपनीच्या सर्व विमानांचे उड्ड्ण आता थांबवले गेले असले तरी कंपनीचे कामकाजाचे लायसन्स केंद्र सरकारने स्थगित केली नाही. त्यामुळे अपघात झालेल्या प्रकाराची विमान वगळून अन्य विमानांनी सेवा देणे या कंपनीने सुरु ठेवले आहे.
रोहित पवार हे व्ही के सिंग व त्यांची व्हीआरएस कंपनी, यांना दोषी मानूनच चालले आहेत. अपघात कोणत्या तांत्रिक बाबीमुळे घडला याचा शोध सुरु आहे. असे अपघात झाल्यानंतर त्यातून पुढे काय धडे घ्यायचे यासाठी चौकशी गरजेची असते. रोहित पवार हे प्रत्येकच गोष्टीत कटाचा वहीम घेऊन बघत आहेत. त्यांची आत्या आणि शरद पवारांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात रोहित यांचे प्रश्न अस्वस्थेतून व काळजीतून आलेत असे म्हटले. म्हणजेच रोहित यांच्या प्रश्नांचा रोख किंवा आरोपांचा आव, सुळेंनाही मान्य दिसत नाही. रोहित यांनी गेल्या सोमवारी पुण्यात डेक्कन भागात एक मोठे बॅनर झळकवले होते. त्यावर फक्त एकच चित्र होते त्यात हँगरला टांगलेला मफलर दिसत होता. त्याचा संदर्भ अजितदादांच्या मृत्युशी असून मुंबईतील पत्रकार परिषदेत खुलासा करण्यात येईल, असे त्या पोस्टरमध्ये म्हटले होते.
मुंबईतील शरद पवार कुटुंबाच्या ताब्यातील यशवंतराव चव्हाण केंद्रात रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन मफलर मॅन म्हणजे मुख्यमंत्री असा कथित गौप्यस्फोट केला. व्ही के सिंग यांच्या मुलाच्या लग्नाला मफलर घालून देवेन्द्र फडणवीस गेले होते म्हणे. व्हीआरएस चार्टर कंपनीच्या मालकाला मुख्यमंत्री संरक्षित करतात पण मी काही मुख्यमंत्र्यांवर आरोप करत नाही असेही रोहीत म्हणाले. याचा दोन्हीचा अर्थ नेमका काय व कसा लावायचा? जे दोषी सिद्ध झालेलाच नाही, त्यांचा बचाव फडणवीस करतात, असे म्हणणे याला मूर्खपणाशिवाय दुसरे काय नाव देणार?! रोहित यांना काय सिद्ध करयाचे आहे ? त्यांच्याकडे असे काय पुरावे आहेत? हे सारे प्रश्न जनतेला पडेल आहेत. ते प्रश्न लोक रोहित पवारांना विचारत राहणार आहेत.