
Maharashtra Politics : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधानांना लिहिले पत्र; केली 'ही' मागणी
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच देशाच्या विविध भागातून महाराष्ट्रातील विमानतळावर विमाने येतात. महाराष्ट्रात येणाऱ्या विमानात अनाउंसमेंट मराठीतून करण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी पंतप्रधान मोदींना लिहिल्याचे सांगण्यात आले आहे.
या संदर्भात नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, भारत सरकारने अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील कोट्यवधी मराठी भाषिकांच्या भावना गौरवण्यात आल्या असून, हा निर्णय मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरेचा सन्मान करणारा आहे. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून, राज्यातील नागरिकांच्या दैनंदिन व्यवहारात तिचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर आदी विमानतळांवर उतरणाऱ्या तसेच येणाऱ्या सर्व देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये मराठी भाषेत अनाउंसमेंट करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
हेदेखील वाचा : ‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न; भाजपच्या नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
सध्या अनेक विमानांमध्ये हिंदी व इंग्रजी भाषेत अनाउंसमेंट केली जाते. मात्र, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेला देखील तितकाच मान मिळणे आवश्यक आहे. यामुळे प्रवाशांना सोयीचे ठरेलच, शिवाय मराठी भाषेच्या संवर्धन व प्रसाराला चालना मिळेल. तसेच, महाराष्ट्रात येणाऱ्या देश-विदेशातील प्रवाशांना येथील स्थानिक संस्कृती व भाषेची ओळख होण्यास मदत होईल.
सर्व विमानतळांवर अनाउंसमेंट करावी
या संदर्भात नागरी विमान वाहतूक मंत्रालय, विमान कंपन्या व विमानतळ प्राधिकरण यांना योग्य त्या सूचना देऊन महाराष्ट्रातील सर्व विमानतळांवर मराठी भाषेत अनाउंसमेंट बंधनकारक करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.
हेदेखील वाचा : Thackeray Brothers alliance : ज्या घोषणेची उत्सुकता ती लवकरच…! ठाकरे बंधूंची चर्चा अंतिम टप्प्यात, उत्सुकता पोहचली शिगेला