Assembly Speaker Rahul Narvekar Press Conference on Ministerial Opportunity in maharashtra government
मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथ होत आहे. सत्ताधारी पक्षातील नेते आणि मंत्रिमंडळातील नेते हे वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकत चालले आहेत. अनेक नेते मारहाण करत आहे तर काही नेत्यांचे समर्थक विधानसभेच्या लॉबीमध्ये फ्री स्टाईल मारामारी करत आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधीमंडळाच्या सभागृहात गेम खेळत आहे तर योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्सबार असल्याचा आरोप केला जात आहे. या सर्व प्रकरणानंतर मंत्रिमंडळामध्ये बदल केले जाणार असल्याचा दावा केला जात आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळामध्ये संधी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. याबाबत नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ठाकरे गटाच्या मुखपत्रातून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिमंडळामध्ये घेतले जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावरुन राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. याबाबत राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. सुरु असलेल्या मंत्रिमंडळातील चर्चेबाबत राहुल नार्वेकर म्हणाले की, विधानसभेचं अध्यक्षपद हे मंत्रिपदापेक्षा श्रेष्ठ असतं. त्यामुळे अध्यक्षपद जाऊन मंत्रिपद मिळालं तर त्याचा आनंद कसा होईल? तरीदेखील पक्षातील वरिष्ठ नेते देतील ती जबाबदारी पार पाडायला मी तयार आहे, अशी भूमिका राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “विधानसभेचे अध्यक्षपद असेल, मंत्रिपद असेल किंवा आमदार म्हणून मला काम दिलेलं असेल, प्रत्येक काम मी योग्यरित्या पार पाडेन. मला लोकांची कामं करायची आहेत, जनतेची कामं करायची आहेत. त्यामुळे मिळतील त्या भूमिका मी पार पाडेन. मंत्रिपद असो अथवा विधानसभेचे अध्यक्षपद असो, पक्षाचं नेतृत्व याबाबतचे निर्णय घेत असतं. मला आतापर्यंत दिलेल्या जबाबदाऱ्या सांभाळून मी संतुष्ट आहे. मी आतापर्यंत सर्वांना न्याय देऊ शकलो. आम्ही आता विधानसभेचे कामकाज डिजिटल करत आहोत. संपूर्ण काम पेपरलेस होईल. अशा अनेक क्रांतिकारी गोष्टी आम्ही केल्या,” असे मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “मला विधानसभेचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या विधानसभेचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. आत्ता झालेल्या अधिवेशनात आम्ही १५२ लक्षवेधी चर्चेला घेतल्या होत्या. आम्ही आमदारांना प्रशिक्षण देतोय, विधानसभेची कार्यक्षमता वाढताना दिसतेय आणि हे सगळे जनतेच्या हिताचंच आहे. अध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मला इतर कुठली जबाबदारी मिळाली तर मी ती देखील पार पाडेन,” अशी सूचक शब्दांमध्ये राहुल नार्वेकर यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या जबाबदारीमध्ये बदल होणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.