कोकाटेंचा राजीनामा घेण्याची घाडगेंची मागणी (फोटो- सोशल मीडिया)
पुणे: गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून चर्चेत आहेत. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला होता. छावा संघटनेने त्यांच्या प्रेसमध्ये पत्ते फेकले होते. त्यानंतर चावा संघटनेच्या विजय घाडगे यांना मारहाण करण्यात आली होती. या सर्व पार्श्वभूमीवर विजय घाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी भेट घेतली. जे काही घडले ते चुकीचे घडले. महाराष्ट्राच्या राजकारणात झाले नाही पाहिजे, असे अजित पवार म्हणाले असल्याचे घाडगे म्हणाले. दरम्यान अजित पवार यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हाकलून द्यावे अशी मागणी छावा संघटनेने केली आहे.
काय म्हणाले विजयकुमार घाडगे?
माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हाकलून द्यावे. त्यांचा राजीनामा न घेतल्यास आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. आम्ही यासाठी मंगळवारपर्यंत वाट पाहणार आहोत. अजित पवारांनी दोन दिवसांची वेळ मागितली आहे. आम्हाला का मारहाण केली? आमचे काय चुकले? असा प्रश्न अजित पवारांना आम्ही विचारले. त्यावर घडलेला प्रकार चुकीचा असून, त्या व्यक्तीला पुन्हा पक्षात घेणार नाही असे पवारांनी सांगितले असल्याचे विजय घाडगे म्हणाले.
लातूरमध्ये वातावरण तापलं! आक्रमक छावा संघटनेने फाडला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो
छावा संघटनेने फाडला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याने लातूरमध्ये वातावरण तापले आहे. लातूरमध्ये छावा संघटनेने बंद पुकारला असून आंदोलन देखील छेडले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. तसेच आक्रमक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचा फोटो देखील फाडला. तसेच राष्ट्रवादी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्यानंतर त्यांच्या विरोधात देखील घोषणाबाजी केली आहे. यावरुन आता राजकीय वातावरण तापले आहे.