Beed murder case accused walmik Karad video before surrenders to Pune CID office pashan raod
पुणे : बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी वाल्मिक कराडने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. मागील 20 दिवसांपेक्षा अधिक दिवसांपासून वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी केली होती. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर वाल्मिक कराड हे नाव राज्यभरामध्ये चर्चेमध्ये होते. अखेर आरोपी वाल्मिक कराड हा पुणे पोलिसांना शरण आला आहे.
पुण्यामध्ये सकाळपासून पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती. सीआयडीला आरोपी वाल्मिक कराड शरण जाणार असल्याचे बोलले जात होते. अखेर त्याने पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडी ऑफिसमध्ये त्याने सरेंडर केले आहे. आतापर्यंतच्या सीआयडीने केलेल्या तपासातून वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती होती. त्यानुसार, आता कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याचे दिसत आहे. दरम्यान, कराड याची 100 हून अधिक बँक खाती गोठवण्यात आली आहे.
मोठी बातमी ! वाल्मिक कराड याचं पुण्यातील सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण
सीआयडीला शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराडचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्याने गंभीर आरोप केले आहेत. वाल्मिक कराडचा शरणागतीच्या पूर्वीच्या व्हिडिओ त्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील आरोप फेटाळून लावले आहेत. वाल्मिक कराड त्या व्हिडिओमध्ये म्हणाला आहे की, मी वाल्मिक कराड, केस पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुण्यातील पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोषभैय्या देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासामध्ये जर मी दोषी ठरलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती मी भोगायला तयार आहे, असे वाल्मिक कराड व्हिडिओमध्ये म्हणाला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सीआयडीचा जोरदार तपास सुरु
रविवारी वाल्मिक कराड याची पत्नी मंजिली कराड यांची सीआयडी पथकाने केज पोलिस ठाण्यात एक तास चौकशी केली. आतापर्यंत त्यांची तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आणि वाल्मिक कराड यांचे अंगरक्षक यांची देखील चौकशी करण्यात आली. तसेच चार ते पाच महिलांना बीड शहर पोलीस ठाण्यात सीआयडीने चौकशीसाठी बोलवले होते. तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. अद्याप त्यांची नावे समोर आली नसली, तरी खंडणी प्रकरणातील आरोपीच्या जवळचे असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आता पोलिस आणि सीआयडीकडून तपासाची सूत्रे वेगाने फिरताना दिसत आहे.