
तिकीट न मिळालेल्यांची भाजप नेते करणार मनधरणी; 'या' नेत्यांकडे विशेष जबाबदारी
मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह इतर 29 महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. असे असताना भाजपच्या अनेक इच्छुकांना महापालिका निवडणुकीत संधी दिली गेली नाही. त्यामुळे त्यांची नाराजी आहे. या नाराज झालेल्या अनेक इच्छुकांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. अशा नाराज उमेदवारांना शांत करण्यासाठी आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्याचे समजते.
उमेदवारी न मिळाल्याने अनेक नाराज उमेदवारांशी संपर्क करत त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला आहे. तसेच पक्षाच्या प्रमुख नेत्यांवरही स्थानिक पातळीवरील नाराजांची मनधरणी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते. अनेक वर्षांनंतर महापालिका निवडणुका होत आहेत. त्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक ठिकाणी महायुती झाल्याने भाजपचे मतदारसंघ मित्र पक्षांना सुटले आहेत. कार्यकर्ता अनेक वर्षे काम करत असतो. त्याला अचानक उमेदवारी नाकारण्यात आल्याने धक्का बसतो.
हेदेखील वाचा : Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई
दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भाजपच्या अशा इच्छुक उमेदवारांचा उद्रेक दिसून आला. त्यातील अनेकांनी पक्षविरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरली आहे. आता अशा नाराज बंडखोरांना शांत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला असल्याचे समजते. अनेक नाराजांशी संपर्क करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची नाराजी दूर करण्यास सुरूवात केली आहे.
शेलार, साटम, दरेकर यांच्यावर जबाबदारी
मुंबईत अध्यक्ष अमित साटम, प्रविण दरेकर, आशिष शेलार या सारख्या नेत्यांवरही नाराजांची समजूत घालण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत भाजपाच्या या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश मिळत आहे. २ जानेवारी ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. बहुतांश नाराजांची नाराजी दूर करण्यात आम्हाला यश येईल असा विश्वास भाजपमधील सूत्रांनी व्यक्त केला आहे.
हेदेखील वाचा : Pune Elections : पुण्यात उमेदवारीचा वाद विकोपाला; शिवसेनेच्या उमेदवाराने चक्क ‘एबी फॉर्म’ फाडून खाल्ला