
BJP Navnath Ban criticizes Uddhav and Raj Thackeray alliance in mumbai politics
पुणे : राज्यामध्ये महापालिका निवडणूका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे्. मुंबईवर वर्चस्व राखण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्षामध्ये युतीची शक्यता आहे. ठाकरे बंधूंमध्ये जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. मात्र यावरुन भाजप नेत्यांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी ठाकरे गटावर प्रखर टीका केली आहे.
भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन म्हणाले की, उबाठा गट आणि मनसे या दोन पक्षांचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे अशा वल्गना खासदार संजय राऊत यांनी करणे हे हास्यास्पद आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये सूज्ञ मतदार या दोन पक्षांचा टप्प्याटप्प्याने करेक्ट कार्यक्रम करतील, असा विश्वास नवनाथ बन यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न असून ज्या मनसेवर शिवीगाळ करत जहरी टीका केली होती त्यांच्याच शिवतीर्थाचे उंबरठे उद्धव ठाकरेंना झिजवावे लागणे हा नियतीचा खेळ आहे असा हल्लाबोलही बन यांनी केला.
मुंबई ही कोणाची खासगी जहागीर नाही
पुढे ठाकरे कुटुंबावर टीका करत ते म्हणाले की, मुंबई सर्वसामान्य नागरिकांची आहे. ज्या उबाठा गटाने खासगी जहागीर असल्याप्रमाणे मुंबईला ओरबाडले त्यांना ‘मुंबई आमचीच’ असे म्हणताना लाज वाटायला हवी. मुंबई हे आमचे घर म्हणता पण कुठलेही घर हे नुसत्या चार भिंतींवर उभे रहात नसते तर विचारांवर उभे असते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांनी शिवसेना बांधली होती त्यांचे विचार पायदळी तुडवत उबाठा गटाने सत्तेसाठी पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला. बाळासाहेबांच्या विचारांची हत्या करून घराची भाषा करणे राऊतांना शोभत नाही अशी टीका भाजप नेत्यांनी केली.
हे देखील वाचा : ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण पहिल्याच दिवशी पाकिस्तानकडून हारलो…! महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बरळले
ते म्हणाले की, फेसबुक लाईव्हवर चालणारे उबाठा सरकार टेस्ट ट्यूब बेबी होते. महायुती सरकारला टेस्ट ट्यूब बेबी संबोधत टीका करणा-या राऊतांना लक्ष्य करत हे सरकार जनतेच्या आशीर्वादातून निर्माण झालेले सरकार आहे, दोन तृतीयांश बहुमताने निवडून आलेले हे जनतेचे लाडके सरकार आहे असे नवनाथ बन यांनी सुनावले. घरातून फेसबुक लाइव्हवर चालणारे उबाठा सरकार टेस्ट ट्यूब बेबी होते. 90 जागा लढून 20 जागा जिंकलेल्यांनी खरे बेबी कोण हे ओळखावे असा टोमणाही नवनाथ बन यांनी लगावला.
शिवतीर्थावर उबाठाचा अधिकार नाही
भाजप नेते बन म्हणाले की, शिवतीर्थ सार्वजनिक वारसा आहे. या शिवतीर्थावर दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विराट सभा झाल्या होत्या.‘शिवतीर्थ आमचेच’ असा दावा करू नका, ज्या दिवशी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडून उबाठा आणि राऊतांनी अफझलखानाची वंशावळ पुढे नेण्याचे काम केले त्याचवेळी शिवतीर्थाचाही अधिकार गमावला अशी सणसणीत टीका नवनाथ बन यांनी केली.
हे देखील वाचा : ज्या घोषणेची उत्सुकता ती लवकरच…! ठाकरे बंधूंची चर्चा अंतिम टप्प्यात, उत्सुकता पोहचली शिगेला
खरा हरामखोर हा उबाठा गट
निवडणूक आयोगाबद्दल हरामखोर शब्द वापरून लोकशाहीचा अपमान राऊतांनी केला आहे. 2019 ला भाजपा सोबत युतीमध्ये निवडणूक लढून सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसणा-या उबाठा गटाला हरामखोर हा शब्द चपखल बसतो. सत्तेसाठी काँग्रेसकडे गेले, तेव्हा निवडणूक आयोग योग्य होता का असा सवालही बन यांनी केला. तसेच राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाबाबत काँग्रेसमध्ये नाराजी असल्याने काँग्रेस आमदार भाजपामध्ये येण्याची लाट सुरू झाली आहे. पक्षात येणाऱ्यांचे भाजपामध्ये नेहमीच स्वागत केले जाते असेही भाजप नेते नवनाथ बन म्हणाले आहेत.