
BJP Ravindra Chavan Target Ajit Pawar On PCMC Corruption Maharashtra Local Body Elections
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये प्रचार केला. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवडमधील भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. अजित पवार म्हणाले की, “पिंपरी चिंचवड पालिकेच्या कारभारामध्ये पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिला नाही. त्यामुळे PCMC शहरामध्ये लुटालुट करणारी गॅंग तयार झाली आहे. म्हणून या भ्रष्टाचारी राक्षसांचं दहन करण्यासाठी आम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. भाजपची राक्षसी भूक पहावत नाही. माझ्याकडे भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत. येथे मोठ्या प्रमाणात हप्तेखोरी सुरु आहे,” असा गौप्यस्फोट करत अजित पवार यांनी वादाची ठिणगी पेटवली.
हे देखील वाचा : रिलस्टार अथर्व सुदामेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ! ‘त्या’ रिलवरुन PMPML ची थेट नोटीस
पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या नेत्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर आता भाजप देखील आक्रमक झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुण्यातील प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना कडक इशारा दिला आहे. तसेच आम्ही आरोप करायला लागलो तर अजित पवारांना अडचण होईल, असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.
रवींद्र चव्हाण म्हणाले की, “अजित पवार यांनी सर्वप्रथम स्वत:च्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवावे. खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील, याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे,” असा इशारा रवींद्र चव्हाण यांनी दिला आहे.
हे देखील वाचा : ओबीसी नेते लक्ष्मण हाके उतरले निवडणुकीच्या रिंगणात; भाजपला म्हटले सर्वात घाबरट पक्ष
मोदींचा सरकार आल्यावर पुण्यात मेट्रो
“यंदाची निवडणूक ही पुण्याच्या विकासासाठी आहे. येथील जनतेला नागरी सुविधा चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात केंद्रात असलेलं एनडीए सरकार आणि राज्यातले महायुती सरकार हे गतिमान सरकार कसं असावं याचं उदाहरण सेट करत आहे. पुण्यात गतिमान पद्धतीने नरेंद्र मोदींच सरकार आणि फडणवीस सरकार काम करत आहे. पायाभूत प्रकल्पांची कामं वेगाने केली जात आहेत. कोट्यवधी रुपये दिले जात आहेत. केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही महाविकास आघाडीला पुण्यात मेट्रो सुरू करता आली नाही. त्यांना ती करायचे नव्हती. त्यांनी सगळं काही केलं नाही. मोदींचा सरकार आल्यावर पुण्यात मेट्रो सुरु झाली, 33 किलोमीटरचे मेट्रो जाळे झाले आहे,” असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत.