BJP Sudhir Mungantiwar responded to displeasure over not place in devendra fadnavis cabinet
नागपूर : राज्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारामुळे महायुतीमधील अनेक नेते नाराज झाले आहेत. महायुतीमधील भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, अजित पवार गटातील छगन भुजबळ त्याचबरोबर शिंदे गटातील तानाजी सावंत असे अनेक पूर्वी मंत्री असलेले नेत्यांना संधी न दिल्यामुळे ते नाराज आहेत. भाजप नेते व माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दोन दिवसांनंतर अखेर हिवाळी अधिवेशनाला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी नाराजीवर देखील भाष्य केले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “मी नाराज नाही. तसे कारणही नाही. 237 आमदारांपैकी 42 आमदारांना मंत्रिपदाची संधी प्राप्त झाली आहे. विधानपरिषदेचा एक आमदार सोडला तर विधानसभेतील 196 आमदारांना मंत्री होण्याची संधी मिळालेली नाही. त्यातलाच मी एक आहे. त्यामुळे नाराज होण्याचे काहीही कारण नाही. कोणतेही पद शाश्वत नाही. पदे मिळतात आणि जातात. भरती-ओहोटी सुरूच राहते. त्यामुळे मी पक्षाचे काम करत राहणार आहे.” असे मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे मुनगंटीवार म्हणाले की, “आता माझ्याकडे पद नाही, असे म्हणता येणार नाही. मी आमदार आहे. त्यातूनही मी जनतेची कामे करू शकतो. आजवर माझ्या मतदारसंघात जेवढी काम मी केलीत त्याचे कौतुक देश करतोय. ‘वक्त आयेगा, वक्त जायेगा’, पण आपले काम करत राहिले पाहिजे. आपल्या एखाद्या कृतीतून पक्षाचे नुकसान होता कामा नये. या पक्षासाठी हजारो लोकांनी त्याग केला आहे. अशा पक्षाला नुकसान होईल, अशी कोणतीही कृती कार्यकर्त्यांनी करू नये”, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.
नागपूर हिवाळी अधिवेशनासंबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्या पेनची शाई होती?
मंत्रिपद देण्याबाबत आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याअगोदर माझे नाव त्या यादीत आहे, हे मला सांगण्यात आले होते. 13 डिसेंबरच्या सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे माझ्याबरोबर दोन-अडीच तास बसून चर्चा करत होते. तेव्हाही त्यांनी मला माझे नाव मंत्रिपदाच्या यादीत असल्याचे सांगितले होते. पण १५ डिसेंबर रोजी काय झाले याची मला कल्पना नाही. कोणत्या पेनची शाई होती, हे मला माहीत नाही.” असा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
अजित पवार गटाचे नेतेही नाराज
अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील नाराज आहेत. त्यामुळे अजित पवार गट व भाजपमध्ये नाराजीनाट्याची लाट आली आहे. छगन भुजबळ यांनी आपली नाराजी यापूर्वी देखील माध्यमांसमोर उघड केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा भुजबळ यांनी नाशिकमध्ये मेळावा घेत आपली भूमिका स्पष्ट केली. देवेंद्र फडणवीस यांनी देखील मी मंत्रिमंडळामध्ये असावे अशी मागणी केली होती. तसेच पक्षातील इतर नेत्यांनी देखील प्रयत्न केले. फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलं भुजबळांना घ्या. असं करू नका सांगितलं. ठिक आहे. आता जे झालं ते झालं. कोणी केलं काय केलं, उलटे सुलटे प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही,” असा टोला छगन भुजबळ यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.