
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र; चंदगडनंतर आता 'या' ठिकाणी लढवणार एकत्रित निवडणूक
कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता दोन्ही राष्ट्रवादींचा चंदगड पॅटर्न पुढे जाताना दिसतोय. चंदगडनंतर आता हायहोल्टेज लढत असलेल्या कागलमध्येही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजितसिंह घाटगे यांची आघाडी झाली आहे. मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद, तर उपनगराध्यक्षपद समरजितसिंह घाटगे गटाला असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. पण यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिकांचा गट मात्र आता एकाकी पडला आहे.
कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत 24 तासांमध्ये मोठ्या उलथापालथी झाल्या आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजित घाटगे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे संजय मंडलिक एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली. येत्या एक-दोन दिवसात अंतिम फॉर्म्युलाही जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा होती. चंदगड पॅटर्न राबवून दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणण्यात यश आलेल्या मुश्रीफ यांना होम ग्राऊंडवरच घेरण्याची रणनीती आखण्यात आली होती. घाटगे आणि मंडलिक एकत्र येण्याच्या शक्यतेने कागलची वाट मुश्रीफांसाठी खडतर ठरण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र, हसन मुश्रीफ यांनीही आपले राजकीय कौशल्य पणाला लावत कट्टर विरोधक असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्याशी आघाडी केली.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ
दरम्यान, याआधी जिल्ह्यातील चंदगड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याची किमया मंत्री मुश्रीफ यांनी केली होती. तोच पॅटर्न आता कागलमध्येही राबवण्यात आला आहे. कागलमध्ये झालेल्या या आघाडीचा परिणाम हा कोल्हापुरातील इतर ठिकाणी तसेच राज्याच्या राजकारणावरही होण्याची शक्यता आहे.
कागलचं राजकारण पूर्णपणे फिरल्याचं चित्र
मंत्री मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्या आघाडीमुळे आता कागलचं राजकारण पूर्णपणे फिरल्याचं दिसून येत आहे. कागलमध्ये या दोन्ही गटांची मोठी ताकद आहे. त्यामुळे नगराध्यक्षपद हे मुश्रीफ गटाला तर उपनगराध्यक्षपद हे समरजितसिंह घाटगे गटाला असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. कागलमध्ये ताकद असलेले मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे हे दोन्ही नेते एकत्र आल्याने शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांची मात्र गोची झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे आता त्यांची पुढची भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.