
महापालिका निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; पण तरीही उमेदवारांना 'असा' करता येणार प्रचार
मुंबई : पुणे, नागपूर, मुंबईसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांच्या जाहीर प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजता थंडावल्या. मात्र, जाहीर प्रचार संपला असला तरी उमेदवाराला ‘डोअर टू डोअर’ म्हणजेच घरोघरी प्रचार करण्याची मुभा असणार आहे. उमेदवार पाच पेक्षा कमी लोकांना सोबत घेऊन वैयक्तिक पातळीवर प्रचार करू शकतात, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी जाहीरसभा, प्रचार रॅली निघणार नाही. मात्र, वैयक्तिक पातळीवर प्रचार करता येणार आहे. याची माहिती निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी दिली. ते म्हणाले, अर्थातच हा नियम मी नव्याने तयार केलेला नाही. तो आधीपासूनच अस्तित्वात होता. यासाठी त्यांनी २०१२ सालच्या निवडणूक आयोगाचा दाखलाही दिला. मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर प्रचार थांबत असतो. मात्र, यावेळी उमेदवाराला या ४८ तासाच्या कालावधीत घरोघरी जाऊन वैयक्तिक पातळीवर प्रचार करण्याची मुभा असेल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
हेदेखील वाचा : Raj Thackeray on BJP: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरेंचा महायुतीवर बॉम्ब; ‘पैसा, उद्योगधंदे अन् राजकारणाचे काढले वाभाडे
या संदर्भात प्रसारमाध्यमांनी निवडणूक आयोगाला पत्रकार परिषदेत धारेवर धरले. हा नियम नव्याने तयार करण्यात आला का? अशी विचारणा करण्यात आली. तेव्हा दिनेश वाघमारे यांनी हा नियम आधीपासूनच आहे नव्याने कोणताही नियम तयार करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट केले.
जाहीरसभा, रॅली, मिरवणुकांना बंदी; पण प्रत्यक्ष भेटता येणार
जाहीर प्रचार हा मतदानाच्या ४८ तास आधी बंद होत असतो. जाहीर सभा, रॅली, मिरवणूका यांचा या जाहीर प्रचारात समावेश आहे. मात्र, वैयक्तिक प्रचाराला बंदी नसते. उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकतात. तसेच हा नियम नव्याने तयार केलेला नाही. लोकसभा आणि विधानसभेला देखील हेच नियम लागू होते, असे सांगताना दिनेश वाघमारे यांनी आयोगाच्याच १४ फेब्रुवारी २०१२ सालच्या एका आदेशाचा संदर्भ दिला. त्यात जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील. मात्र, माईकचा वापर करता येणार नाही. तसेच उमेदवारांना समुहाने फिरता येणार नाही, असेही त्यात नमूद करण्यात आले.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीला ३,००० रुपये मिळणार? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर