Chhagan Bhujbal calls meeting of OBC community leaders in Mumbai for reservation
मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील हे हजारो समर्थकांसह मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण सुरु केले असून यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. जरांगे पाटील यांनी आरक्षणाशिवाय मागे हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. यानंतर आता मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ हे मैदानामध्ये उतरले आहेत.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. यामुळे ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात जोरदार विरोध दर्शवला आहे. जालना जिल्ह्यात येत्या 1 सप्टेंबरपासून ओबीसी संघटना आपले उपोषण चालू करणार आहेत. यामध्ये अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. अखेर मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाची एकत्रित बैठक बोलावून हालचाली सुरु केल्या आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीडिया रिपोर्टनुसार, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना मुंबईत बोलावले आहे. 1 सप्टेंबर रोजी ओबीसी नेत्यांनी मुंबईत यावे आणि बैठकीत सहभागी व्हावे, असा संदेश भुजबळ यांनी दिला आहे. मात्र मराठा समाज देखील मुंबईमध्ये जमा झाला आहे. तर आता छगन भुजबळ यांनी देखील ओबीसी समाजाची बैठक मुंबईमध्ये बोलावली आहे. यामुळे मुंबईमध्ये आरक्षणावरुन वातावरण तापले आहे.
मंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेल्या ओबीसी बैठकीमध्ये नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? या बैठकीतून नेमकी काय भूमिका घेतली जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्यातरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशीच भूमिका सर्व ओबीसी नेत्यांची आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या या बैठकीत ओबीसी नेते आंदोलनाची हाक देणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यामुळे राज्यामध्ये आरक्षणाचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा आरक्षणाबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिलेली असताना सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करीत आहेत. आपण महाराजांसोबत तुलना करीत नाही अन्यथा नवीन वाद तयार होईल,कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसीमधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील,”असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.