मराठा आंदोलनावर प्रतिक्रिया देणाऱ्या राज ठाकरेंचा मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला (फोटो - सोशल मीडिया)
Maratha Reservation : मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. आज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ हजारो समर्थक हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. रेल्वे स्टेशन, मेट्रो पुलाखाली मराठा बांधवांनी तळ ठोकला आहे. यावर मनसे नेते राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्या वक्तव्याचा जरांगे पाटील यांनी समाचार घेतला आहे.
मनसे नेते राज ठाकरे हे अभिजीत पानसे यांच्या घरी गणराय़ाच्या दर्शनासाठी गेले होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मनसे नेते राज ठाकरे यांना माध्यमांनी मुंबईमध्ये मराठा बांधवांबाबत प्रश्न विचारला. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, माध्यमांच्या आणि लोकांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्याची उत्तरे फक्त एकच माणूस देऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देऊ शकतात. कारण मागच्या वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच नवी मुंबईमध्ये गेले होते ना! त्यांनी नवी मुंबईमध्ये जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला होता. मग आता पुन्हा एकदा मराठा आंदोलक मुंबईमध्ये परत का आले? या सर्व गोष्टीची उत्तरे फक्त एकनाथ शिंदे हेच देऊ शकतात, असे मत मनसे नेते राज ठाकरे यांनी व्यक्त केले. या वक्तव्याचा मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळाहून माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी अमित ठाकरे यांच्या पराभवाची आठवण करुन दिली. जरांगे पाटील म्हणाले की, “कधीपर्यंत तुम्ही भाजपाची री ओढणार आहात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील. तुमच्या स्वतःच्या मुलाला भाजपने निवडणुकीमध्ये पाडलं,” असा टोला जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
तरीही राज ठाकरे यांना काहीच वाटत नाही
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “आम्ही दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून आम्ही त्यांना मानायला लागलो. पण राज ठाकरे यांना मध्ये मध्ये काय होतं हेच कळत नाही? ते आम्हाला विनाकारण टोकरत असतात. भाजपने राज ठाकरे यांचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वापर करुन घेतला. पण विधानसभेला त्यांच्याच मुलाचा पराभव केला. तरीही राज ठाकरे यांना काहीच वाटत नाही,” अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी मनसे नेते राज ठाकरे यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “आम्ही मुंबईला का आलो हे विचारणारे तुम्ही कोण आहात? तुम्हाला पूर्वी ११ आमदार निवडून दिले होते. ते दुसरीकडे पळून गेले. तुम्ही मराठवाड्यात कशाला येता, हे तुम्हाला विचारले का कधी? तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आणि बाकी ठिकाणी जाता, तिथे कशाला जाता, हे विचारले का तुम्हाला कधी. आम्ही ठाकरे ब्रेडला चांगले मानत होतो. पण ते ऊठसूट आमच्यावरच बोलतात. देवेंद्र फडणवीस एकदा घरी जेवायला काय आले, ते त्यांचीच तळी उचलत राहतात”, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर टीका केली.