
Maharashtra Winter Session : नाना पटोलेंच्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर; म्हणाले...
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेमुळे निराधार योजनेतील निधी कमी झाल्याचा आरोप केला. पटोलेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ‘निराधार योजनेचे पैसे अडवलेले नाहीत. केवायसी पूर्ण न झाल्याने केवळ 10 टक्के लाभार्थ्यांचे पैसे थांबले असून, ती अडचण दूर केली जात आहे’, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये प्रश्नोत्तराच्या तासात लाडकी बहीण योजनेचा वारंवार उल्लेख केला गेला. विरोधकांकडून कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लाडक्या बहिणींना विरोध करू नका; नाहीतर घरी बसावे लागेल, असा स्पष्ट इशारा त्यांनी मंगळवारी सभागृहात दिला. लाडकी बहीण योजनेची तुलना इतर कोणत्याही योजना किंवा विषयांशी करणे चुकीचे आहे. ही योजना सुरूच राहणार असून, तिला निधी देणे थांबविण्यात येणार नाही.
हेदेखील वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर 3000 मिळणार; डिसेंबरमध्ये खात्यात होणार रक्कम जमा
दरम्यान, राज्यातील अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यामुळे तिच्याविषयी संभ्रम निर्माण करणारे विधान अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच महिला डॉक्टर आत्महत्येचा मुद्दा फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्येच्या प्रकरणावर काँग्रेसच्या आमदार अॅड. ज्योती गायकवाड यांनी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला.
महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशी सुरू
त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणी आरोपोंविरोधात ठोस पुरावे मिळाले असून लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल. महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे. काहींनी या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला, हे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.
महिला सुरक्षितता महत्त्वाचीच
महिला सुरक्षेवर भर दिला पाहिजे, असे गायकवाड यांनी लाडकी बहीण योजनेपेक्षा महिलांच्या सुरक्षिततेवर भर दिला पाहिजे, असे म्हणत योजनेचा संदर्भ दिला होता. त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी महिला सुरक्षितता महत्त्वाचीच असल्याचे मान्य केले.
निराधार योजनेचे पैसे अडविलेले नाहीत
नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेमुळे निराधार योजनेतील निधी कमी झाल्याचा आरोप केला. त्यावर फडणवीस म्हणाले की, निराधार योजनेचे पैसे अडविलेले नाहीत. केवायसी पूर्ण न झाल्याने केवळ १० टक्के लाभार्थ्यांचे पैसे थांबले असून ती अडचण दूर केली जात आहे.
योजनेला विरोध केला तर…
भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी अवैध दारूविक्रीच्या समस्येचा उल्लेख करताना लाडक्या बहिणीचे दुःख अशी टिप्पणी केली. या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगेचच त्यांना सुनावत म्हटले, “प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण योजना आणू नका. योजनेला विरोध केला, तर त्याची राजकीय किंमत मोजावी लागू शकते. अवैध दारूविक्री थांबवण्यासाठी अध्यक्षांच्या निर्देशानंतरही कारवाई झाली नसल्याची तक्रार पवार यांनी केली होती. या संदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, अवैध दारुविक्रीविरोधातील कारवाई होत असून आवश्यक ती पावले उचलली जातील, असे म्हटले आहे.