Marathwada Rain: "सगळे जण शेतकऱ्यांच्या बांधावर..."; भाजप नेत्या चित्रा वाघ काय म्हणाल्या?
राज्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
चित्रा वाघ यांचे शक्ती कायद्यावर भाष्य
सायबर कायद्यात सुधारणा करण्याची गरज
Chitra Wagh: राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे. या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना 2200 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही मदत तोकडी असल्याची टीका केली जात आहे. यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे राज्याच्या दौऱ्यावर आहेट. सगळे जण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. सरकारकडून पूर्ण नुकसान भरपाई लवकरच करण्यात येईल. सरकार शेतकऱ्यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहील. ज्या-ज्या ठिकाणी पूरस्थिती आली आहे त्या त्या ठिकाणी पूर्ण मंत्रिमंडळ शेतकरी बांधवांसोबत आहेत.” रोहित पवारांनी ट्वीट करत शेतकऱ्यांना केलेली मदत तोकडी असल्याचे म्हटले आहे.
“आपल्याकडचे कायदे हे खूप सक्षम आहेत. मात्र त्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. यासाठी आग्रही भूमिका घेऊन सायबर कायद्यात सुधारणा केली पाहिजे. मुख्यमंत्री प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत लक्ष घालून या राज्यातील प्रत्येक लाडक्या बहिणींना कसं सुरक्षित ठेवता येईल त्याच्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. झिरो टॉलेरन्स पॉलिसी ही महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आहे”, असे भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.
राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठीशी – फडणवीस
अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे. शेती पिकांचे जनावरांचे घरांचे व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झालेले असून पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली, त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीत मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.