
मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर 32 तास अडकले प्रवासी
सी लिंक व कोस्टल रोडसाठी हवाई आपत्कालीन सुविधांवर भर
दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर परिस्थिती
मुंबई: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस टँकर उलटून गंभीर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत कित्येक तासांहून अधिक काळ प्रवासी अडकले. या पार्श्वभूमीवर भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन वांद्रे–वरळी सी लिंक, वर्सोवा–वांद्रे वरळी सी लिंक तसेच संपूर्ण कोस्टल रोडवरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यावर भर देत यासंदर्भातील प्रस्ताव संबंधित यंत्रणांनी सादर करण्याची कार्यवाही करण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले.
पालकमंत्री ॲड.शेलार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात, अशा महत्त्वाच्या मार्गांवर अपघात, आग किंवा नैसर्गिक आपत्ती घडल्यास तातडीने व प्रभावी प्रतिसाद देणे मोठे आव्हान ठरू शकते, असे नमूद करुन विशेषतः कोस्टल रोड हा भुयारी व समुद्रावरून जाणारा मार्ग असल्याने जखमींना त्वरित रुग्णालयात हलवणे, सुरक्षा यंत्रणांची जलद हालचाल आणि आपत्कालीन सेवा पोहोचवणे या बाबी महत्वपूर्ण असल्याचे नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे रेक्लेमेशन परिसरात, सी लिंकजवळ हेलिपॅड उभारणी, हेलिपॅडसाठी आवश्यक जागा यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही नमूद करण्यात आले आहे.
हेलिपॅड उभारणीद्वारे कोस्टल रोड व सी लिंकवरील आपत्कालीन परिस्थितीत जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे तातडीने रुग्णलयात हलविणे. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ व इतर यंत्रणांमधील समन्वय अधिक प्रभावी करणे. मुंबईसारख्या दाट लोकसंख्येच्या आर्थिक राजधानीसाठी दीर्घकालीन आपत्कालीन आराखडा अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात असल्याचे पालकमंत्री ॲड.शेलार यांनी म्हटले आहे.