
cjp press conference
CJP Press Conference : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाची हाक देणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) कार्यकर्त्यांची सुटका झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर सोडण्यात आलं. त्यानंतर आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेत आशुतोष रांका यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला. ‘नरेंद्र मोदी यांच्यासारखा भित्रा पंतप्रधान भारतात आतापर्यंत पाहिला नाही,’ असं म्हणत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले.
गेल्या 72 तासांत हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा आणि आंदोलनासाठी निघालेल्या लोकांना मारहाण झाल्याचा आरोप रांका यांनी केला. दिल्लीतील परिस्थितीमुळे देशाची बदनामी झाल्याचं सांगत त्यांनी यासाठी मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जबाबदार धरलं.
निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेली लढाई केंद्र सरकारने स्वतःकडे वळवून घेतल्याचा आरोप रांका यांनी केला.
ज्ञानेश कुमार हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत असून भाजपला जिंकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावाही त्यांनी केला. आयोगाची जबाबदारी लोकशाहीचं रक्षण करण्याची आहे; मात्र आयोग सत्ताधाऱ्यांसाठी काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. हे आरोप रांका यांनी पत्रकार परिषदेत केले.
1975 मधील आणीबाणीबद्दल आपल्या आई-वडिलांकडून ऐकलं होतं; मात्र गेल्या 72 तासांत दिसलेली परिस्थिती गंभीर असल्याचं रांका म्हणाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्याचा आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागल्याचा दावाही त्यांनी केला.
अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन झाल्याची माहिती देताना रांका यांनी पोलिसांच्या वागणुकीवरही प्रश्न उपस्थित केले. दिपके यांना कुटुंबीयांशी बोलू दिलं नसल्याचा आरोप त्यांनी केला. सुटकेनंतर दिपके कुटुंबीयांच्या भेटीसाठी हिंगोलीला रवाना झाल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, CJP ने सुरू केलेली लढाई थांबलेली नसून ती पुढेही सुरू राहणार असल्याचा निर्धार रांका यांनी व्यक्त केला. या आरोपांवर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागलं आहे.