मुख्यमंत्री फडणवीस-आदित्य ठाकरे यांच्यात गुप्तभेट
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सध्या घडत आहेत. अशातच, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात हाणामारीचे प्रकरण समोर आले. या घटनेमुळे वातावरण तापले आहे. असे असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची भेट झाली. या भेटीमुळे राजकीय क्षेत्रात नवे अंदाज बांधले जात आहेत. विशेष म्हणजे या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मुंबईतील सॉफिटेलमध्ये या दोघांची बंद दाराआड चर्चा झाल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर ही भेट होत असल्याने या भेटीची चर्चा रंगली आहे. देवेंद्र फडणवीस यांची आदित्य ठाकरे यांनी वांद्रे येथील सोफीटोल हॉटेलमध्ये भेट घेतली. ही भेट जवळपास तीन तासांपेक्षा जास्त वेळ चालली. या बैठकीबाबत कुणालाही माहिती नव्हती. त्यामुळे या बैठकीबाबत आता राजकीय तर्क लावले जात आहे. ही भेट ठरवून झाली असल्याचे बोलले जात आहे.
देवेंद्र फडणवीसांकडून मात्र जैन गुरूंच्या भेटीसाठी आल्याचं ट्वीट केले होते. प्रत्यक्षात मात्र देवेंद्र फडणवीस आणि आदित्य सात वाजण्याच्या सुमारास येथे पोहचले. दोघांच्या येण्यात अवघ्या पाच मिनिटांचे अंतर होते. गेल्या काही दिवसात ठाकरे फडणवीसांचे सुर जुळताना दिसत आहे.
एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीनंतर…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच दिल्लीवारी केली होती. या भेटीदरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचे कळते. या भेटीबाबतच तपशील उघड होऊ शकला नाही. परंतु एकनाथ शिंदे हे दिल्लीवारी करून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची ठाकरेंशी जवळीक वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
उद्धव ठाकरे यांनीही घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट
उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे हा घटनाक्रम जुळवला जात आहे. अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत फडणवीस यांनी तर ठाकरेंना थेट सत्तेत सहभागी होण्याची एकप्रकारे ऑफरच दिली होती. त्यात फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या ताज्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.