cm Devendra Fadnavis on eknath shinde shivsena Rebellion maharashtra political news
Devendra Fadnavis Marathi News : मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एका बंडखोरीमुळे मोठे वळण मिळाले. महाविकास आघाडी सत्तेमध्ये असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेना पक्षामध्ये न भुतो न भविष्यती अशा स्वरुपाची राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी बहुसंख्य आमदारांसह बंड केला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी बंडखोरी झाल्यामुळे राज्याच्या राजकारणाने कलाटणी घेतली. यावर आता भाजप नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या बंडखोरीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीपूर्वीची परिस्थिती सांगितली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी ते म्हणाले की, ठाकरेंचा पक्ष फुटला यासाठी ते आम्हाला दोष देऊ शकत नाहीत. कारण एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना मानणारे कट्टर शिवसैनिक आहेत. ते पक्षातून बाहेर पडलेच नसते. पण ज्यावेळी एकनाथ शिंदेना हे कळलं की उद्धव ठाकरे आता आदित्य ठाकरेंना नेते म्हणून पुढे आणण्यासाठी आपलेच पंख कापत आहेत. जे खातं एकनाथ शिंदेकडे होतं त्याच्या बैठकाही आदित्य ठाकरेच घेऊ लागले होते. दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचे असे पंख कापणं सुरु केलं त्यामुळे त्यांची महत्त्वाकांक्षा होतीच. त्यामुळे त्यांनी तो उठाव केला, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
“काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेल्याने ते हिंदुत्वाबाबत काही बोलू शकत नव्हते. ते हे मान्यच करायला तयार नव्हते. उद्धव ठाकरे हे मान्यच करायला तयार नाहीत की त्यांच्या आमदारांसह त्यांचा संपर्क तुटला होता. उद्धव ठाकरेंकडे कमी खोके आहेत का? तसं काहीच नाही. उद्धव ठाकरेंनी जी व्यवस्था निर्माण केली होती त्या व्यवस्थेला एकनाथ शिंदे आणि इतर आमदार वैतागले होते. एकनाथ शिंदे यांना बाहेर बसवण्यात आलं होतं. तो अपमान झाला आणि एकनाथ शिंदेनी तोचा दिवस निवडला. कारण एकनाथ शिंदेंना बाहेर बसवण्यात आलं आणि कन्सलटंट आतमधे मतदान कसं करायचं सांगत होता. हा तोच दिवस होता जेव्हा एकनाथ शिंदेच्या सहनशक्तीचा कडेलोट झाला. त्यामुळे त्यांनी उठाव केला,” असा मोठा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी जेव्हा महाराष्ट्राची सीमा ओलांडली तेव्हा माझ्याशी संपर्क केला. मला त्यांनी सांगितलं की मी निघालो आहे. त्यांना मी सांगितलं मी आहे काळजी करु नका. त्यानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले. पुढे काय झाले ते सगळ्यांना माहीत आहेच. एकनाथ शिंदेनी हिंमत दाखवून जो उठाव केला त्यानंतर पहिल्या दिवसापासून ठरलं होतं की एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार. माझ्या किंवा इतर कुणाच्याही मनात बाकी कुठलीही गोष्ट आलीच नाही. मी सरकारच्या बाहेर राहणार होतो. पण माझ्या पक्षाने सांगितलं की तुला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. सरकारमध्ये मी होतो त्यामुळे आम्ही मजबुतीने ते सरकारही चाललं,” असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.