संग्रहित फोटो
मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नविनयुक्त कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक ११ व १२ ऑगस्ट रोजी पुण्याच्या खडकवासला येथील सोरिना हिल रिसॉर्ट येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.
प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे १० ऑगस्ट रोजीच या कार्यशाळेसाठी पुण्यात पोहोचणार आहेत. १० ऑगस्ट रोजी सांयकाळी ६ वाजल्यापासून कार्यक्रमस्थळी या कार्यशाळेसाठी निमंत्रीत पदाधिकऱ्यांची नोंदणी होईल. ११ ऑगस्ट रोजी सकाळी, ७ वाजता सामुदायिक प्रार्थनेने शिबिराची सुरुवात होईल. त्यानंतर १० वाजता प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.
नेते आणि वक्त्यांचे मार्गदर्शन, विविध चर्चासत्रेही होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राजकीय व्यवहार समितीची बैठकही होणार आहे. १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने या कार्यशाळेची समाप्ती होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का
राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींनाही वेग आला असून अनेक नेते, पदाधिकारी महायुतीत पक्षप्रवेश करताना दिसत आहेत. अशातच भाजपने काँग्रेसला पुणे जिल्ह्यात मोठा धक्का दिला आहे. पुरंदरचे माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच पुण्याचे कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीदेखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर माजी आमदार संग्राम थोपटे यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर आता संजय जगताप यांच्याही भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक मोठा फटका बसला आहे. अशातच आता काँग्रेस पक्षाने संघटना मजबुतीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत.