CM Mamata Banerjee decision Waqf Board Amendment Bill not be implemented in West Bengal
कोलकाता : देशामध्ये सध्या वक्फ बोर्डवरुन राजकारण रंगले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने लोकसभेमध्ये २८८ तर विरोधात २३२ मते पडली आहेत. तर राज्यसभेमध्ये देखील हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील स्वाक्षरी केली आहे. यामुळे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे लवकरच कायद्यात रुपांतर होणार आहे. मात्र त्यापूर्वी या विधेयकाला अनेकांनी न्यायालयामध्ये आव्हान दिले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पश्चिम बंगालमध्ये ते लागू करणार नाही असा पवित्रा ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे.
तृणमृल कॉंग्रेसने यापूर्वी देखील वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली होती. राष्ट्रपतींनी विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर देखील ममता बॅनर्जी या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ममता बॅनर्जी यांनी एका भाषणादरम्यान, वक्फ सुधारणा विधेयकाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच त्यांनी ही पश्चिम बंगाल सरकारची ठाम भूमिका असल्याचे देखील म्हटले आहे. त्यामुळे वक्फ बोर्ड विधेयक हे पश्चिम बंगालमध्ये लागू होणार नाही.
भाषणामध्ये बोलताना ममता बॅनर्जी यांनी वक्फ बोर्ड विधेयकाबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले की, “मला कल्पना आहे की वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मंजूर झाल्यामुळे तुमच्या मनात असंतोष आहे. पण बंगालमध्ये असं काहीही घडणार नाही. राजकीय चळवळीसाठी काही लोक तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करत असतील, पण त्यांच्या भडकवण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. याप्रकारे फोडा आणि राज्य करा धोरणातून एखादी व्यक्ती सत्ता गाजवेल त्यावेळी सगळ्यांनी एकत्र राहायला हवंय, असा संदेश तुम्ही द्या”असे मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुर्शिदाबाद हिंसाचाराचा केला उल्लेख
मुर्शिदाबादमध्ये वक्फ विधेयकावरून हिंसाचार झाल्याने त्यांनी निषेध व्यक्त केला. बॅनर्जी म्हणाल्या की, “बांगलादेशच्या सीमाभागातील परिस्थिती तुम्ही पाहा. या परिस्थितीत वक्फ सुधारणा विधेयक मंजूरच व्हायला नको होते. पश्चिम बंगालमध्ये ३३ टक्के अल्पसंख्याक आहेत. मी त्यांचं काय करू? इतिहासात लिहिलंय की पश्चिम बंगाल, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत हे सगळे एकत्रच होते. फाळणी नंतर झाली. पण आता जे इथे राहात आहेत, त्यांना संरक्षण देणं हे आपले काम आहे. जर लोक एकत्र राहिले, तर ते जग जिंकू शकतात,” असे स्पष्ट मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे त्यांनी पश्चिम बंगालमधील नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, “काही लोक तुम्हाला रस्त्यावर उतरण्यासाठी भडकवण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही असं काही करू नका असं माझे तुम्हाला आवाहन आहे. तुम्ही लक्षात ठेवा की मी इथे आहे तोपर्यंत मी तुमचं आणि तुमच्या मालमत्तेच रक्षण करेन. आपण एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा. मी सर्व धर्माच्या ठिकाणांना भेटी देते आणि यापुढेही देत राहणार आहे. तुम्ही मला गोळ्या जरी घातल्या तरी मला यापासून परावृत्त करू शकणार नाहीत. प्रत्येक धर्म, जात, पंथ हे मानवतेसाठीच प्रार्थना करत असतात आणि आपले त्या सगळ्यांवर प्रेम आहे,” अशी भूमिका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली आहे.