
congress Amit Deshmukh condoles DCM Ajit Pawar death Baramati News
Amit Deshmukh on Ajit Pawar : लातूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले आहे. विमान लॅडिंग दरम्यान कोसळल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या अकाली मृत्यूमुळे राजकीय वर्तुळातून शोत व्यक्त केला जात आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि माजी वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी पोस्ट करुन शोक व्यक्त केला आहे.
अमित देशमुख यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अमित देशमुख यांनी लिहिले आहे की, “बारामती येथील विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला वेदना देणारे आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने महाराष्ट्राने एक धाडसी, स्पष्टवक्ते आणि विकासाभिमुख नेतृत्व हरवले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत आज आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती, ‘दादामाणूस’ गेल्याची भावना व्यक्त होत आहे. माझीही तीच भावना आहे.”
हे देखील वाचा : अजितदादांचे राजकारणात अढळ स्थान…; राहुल गांधींसह योगी आदित्यनाथांनी व्यक्त केला शोक
“आज सकाळी बारामती विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या विमानाचा अपघात झाल्याचे वृत्त आले, तेव्हा विमानातील सर्वजण सुखरूप असावेत अशीच प्रार्थना मनात होती. मात्र, काही वेळाने आलेली ती दु:खद बातमी मनाला सुन्न करून गेली. अजितदादा हे महाराष्ट्रातील धडाडीचे, प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि कल्पक नेते होते. “जे काम होऊ शकते ते होईल” आणि “जे होत नाही ते होणार नाही” असे स्पष्टपणे सांगणारे ते एकमेव आणि निर्भीड राजकीय नेते होते.”
बारामती येथील विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय अजित पवार साहेब यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि मनाला वेदना देणारे आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने महाराष्ट्राने एक धाडसी, स्पष्टवक्ते आणि विकासाभिमुख नेतृत्व हरवले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक… pic.twitter.com/H2OlkIymEj — Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) January 28, 2026
“सुस्पष्ट दृष्टिकोन, काटेकोर नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी ही त्यांची खास ओळख होती. माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री व उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय प्रभावी कार्य केले. पक्ष वेगवेगळे असले तरी, पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून ते आदरणीय साहेबांचा नेहमी ‘आवडते मुख्यमंत्री’ म्हणून उल्लेख करत. यातूनच त्यांच्या मनाचा निर्मळपणा दिसून येत असे.”
हे देखील वाचा : कर्तव्यदक्ष आणि रोखठोक नेतृत्व! अजित पवारांच्या मृत्यूवर मंत्रिमंडळातील नेते भावूक
“महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळातही ते उपमुख्यमंत्री असताना, मंत्री म्हणून माझा त्यांच्याशी निकटचा संपर्क आला. या कार्यकाळात त्यांचे नेहमीच सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. अलीकडच्या काळातही जेव्हा जेव्हा त्यांची भेट झाली, तेव्हा त्यांची तीच आपुलकी आणि सहकार्याची भावना अनुभवायला मिळाली. केवळ माझ्याच बाबतीत नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांतील नेते आणि कार्यकर्त्यांशी त्यांचे सौहार्दाचे, सहकार्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. आज अचानकपणे आपण अशा धाडसी, विकासाभिमुख आणि लोकप्रिय नेतृत्वाला मुकलो आहोत. आम्ही सर्व देशमुख कुटुंबीय, पवार कुटुंबीयांच्या या दुःखात सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर आज लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व प्रचार कार्यक्रम व सभा रद्द करण्यात येत आहेत,” असे अमित देशमुख यांनी लिहिले आहे.