Congress leader Yashomati Thakur is aggressive against CM Devendra Fadnavis over Parbhani and Beed case
अमरावती : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. एकीकडे महायुतीचे सरकार स्थापन व मंत्रिमंडळ विस्तार सुरु आहे. तर दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढत आहे. बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. तर परभणीमध्ये संविधानाची विटंबना करण्यात आली. या प्रकरणामध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा कारागृहामध्ये मृत्यू झाला. या प्रकरणावरुन विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देखील आवाज उठवण्यात आला. मात्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीवर विरोधकांनी ही माहिती खोटी असून आंदोलन केले. सुर्यवंशी कुटुंबियांची अनेक विरोधातील नेत्यांनी भेट घेतली आहे. तर बीडमधील प्रकरणावर बीडमधील नेते प्रतिक्रिया देत नसल्यामुळे देखील विरोधक आक्रमक होत आहेत. या प्रकरणावरुन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. यावरुन आता कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आक्रमक पवित्रा घेत कारवाईची मागणी केली आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कॉंग्रेस नेते व लोकसभेची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील काल (दि.23) महाराष्ट्र दौरा केला. राहुल गांधी यांनी परभणी दौरा करुन या प्रकरणाची दाहकता दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच राहुल गांधी यांनी सुर्यवंशी कुटुंबियांची भेट देखील घेतली. तसेच त्यांना आधार देखील दिला. मात्र यावरुन भाजप नेत्यांनी जोरदार टीका देखील केली. राहुल गांधींच्या या महाराष्ट्र दौऱ्यावरील भाजपच्या टीकेवर कॉंग्रेस नेत्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यशोमती ठाकूर यांनी अमरावतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील या गुन्हेगारीच्या प्रकरणावरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की राहुल गांधी राजकारण करत आहेत म्हणजे गरिबाचे पोरगे मेले तर त्याला राजकारण म्हणायचे आणि श्रीमंताचे पोरगं गाडीने लोकांना उडवतं तर त्याला राजकारण नाही म्हणायचे, हे चुकीचे आहे. ज्या ज्या वेळी कोणावर अन्याय होतो तेव्हा आम्हा रस्त्यावर उतरू. राहुल गांधी विरोधी पक्षनेते त्यांचे कर्तव्य अन्याया विरुद्ध वाचा फोडणे. याला राजकारण नाही, न्यायाची मागणी म्हणतात आणि बीड, परभणी मध्ये न्याय झाला पाहिजे. जर न्याय मिळाला नाही तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री पद सोडावे,” असा आक्रमक पवित्रा कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्यामध्ये सोयाबीनचे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याचा आरोप देखील केला जात आहे. पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगांव, खेड, शिरूर या भागात राज्य सरकारने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या सोयाबीन पिकाच्या भावावरुन यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “3200 रुपयाने सोयाबीन विकले जात आहे. आम्ही सत्तेमध्ये आलो असतो तर सोयाबीन ७००० रुपये भाव देणार होतो. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करणार असे मुख्यमंत्री म्हणाले होते, त्यांनी ते केले पाहिजे,” अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे.