
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची 'एकला चलो रे'ची भूमिका? आघाडीची शक्यता धूसरच...
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका एकत्रित लढायच्या की स्वबळावर याबाबत कुठल्याच पक्षाचा निर्णय झालेला नाही. सर्वच पक्षांनी स्थानिक नेत्यांना अधिकार दिल्याचा दावा केला आहे.
असे असताना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्यास आघाडीत यायला तयार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, काँग्रेसने यास अद्याप कुठलाही प्रतिसाद दिला नसून नागपूर जिल्ह्यातील सर्व इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम काँग्रेसने जाहीर केला आहे. हे बघता आघाडीची शक्यता मावळल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील १२ नगर पंचायती आणि १५ नगर परिषदांमध्ये निवडणुका होत आहेत. यात कामठी, उमरेड, वाडी, काटोल, रामटेक, सावनेर, खापा, कळमेश्वर-ब्राम्हणी, नरखेड, मोहपा, मोवाड, वानाडोंगरी, बुटीबोरी, कन्हान पिपरी आणि डिगडोह (देवी) या नगर परिषदा आहेत. तर महादुला, मौदा, भिवापूर, बहादुरा, कांद्री-कन्हान, बिडगाव-तरोडी, बेसा-पिपळा, पारशिवनी, नीलडोह, कोंढाळी, गोंधनी रेल्वे, येरखेडा या नगर पंचायती आहेत.
स्थानिक निवडणुकीत आघाडीचा निर्णय अद्याप झालेले नाही. तो होईल तेव्हा होईल. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार आम्ही आमची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका आहेत. तेथील सर्वच इच्छुकांच्या मुलाखती शुक्रवारी (ता.७) ग्रामीण काँग्रेसच्या मुख्यालयात घेण्यात येणार आहे. आमची इच्छा आघाडी करून लढायची आहे. मात्र, याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. वरिष्ठ नेते जे ठरवतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल. सध्या आम्ही आमची तयारी सुरू केली असल्याचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्विन बैस यांनी सांगितले.
राष्ट्रवादी समविचारी पक्षांना घेणार सोबत
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबत कोणीच चर्चा करत नाही. त्यामुळे आम्ही समविचारी पक्ष आणि संघटनांनासोबत बोलणी करत आहोत. काँग्रेसने सन्मानजनक जागा दिल्या नाही तर आम्ही आमच्या आघाडीसोबत या निवडणुका लढणार असल्याचे सांगितले आहे.
बंडखोरी काँग्रेसपुरस्कृत; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा आरोप
काँग्रेसने यापूर्वी जिल्हा परिषद आणि विधानसभेच्या निवडणुकीत दगाबाजी केली. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसच्या काही नेते व कार्यकार्त्यांनी बंडखोरी केली होती. त्यांना कोणी रोखले नाही. महिनाभरानंतर सन्मानाने त्यांना पुन्हा पक्षात घेतले. मोठे पद दिले. यावरून ही बंडखोरी काँग्रेस पुरस्कृत असल्याचा आरोप शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी केला आहे.