Congress Vijay Wadettiwar target government for Gautam Adani company
मुंबई : केंद्रापासून राज्यापर्यंत कॉंग्रेस पक्ष गौतम अदानी यांच्यावर जोरदार टीका करत आहे. मोदी सरकार आणि राज्यामध्ये महायुती सरकार गौतमी अदानी यांच्यासाठी काम करत असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. राज्यातील धारावी प्रकल्पावरुन तर रान पेटले आहे. यानंतर आता आणखी एक प्रकल्प राज्य सरकारने गौतम अदानी यांच्याकडे सोपवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. कॉंग्रेस नेते व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत विजय वडेट्टीवार यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
चंद्रपूरमधील घुग्घुस येथील कार्मेल एज्युकेशन सोसायटी संचालित माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट उच्च माध्यमिक शाळा, घुग्घुस या इंग्रजी माध्यमाच्या स्वयंअर्थसहाय्यित उच्च माध्यमिक (1 ली ते 12 वी) शाळेचे अदाणी फॉउंडेशन, अहमदाबाद या संस्थेकडे हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय घेण्यात आला आहे. अदाणी फाऊंडेशन आता या शाळेचं व्यवस्थापन पाहणार आहे. याचा शासन निर्णय काढण्यात आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एक्स (ट्वीटर) पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. वडेट्टीवार यांनी शासन निर्णयाची प्रत देखील शेअर केली आहे. यामध्ये “सदर शाळेचे व्यवस्थापन अदाणी फाऊंडेशन, अहमदाबाद या संस्थेकडे हस्तांतरीत करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासह काही अटी वर शर्ती लागू करण्यात आल्या आहेत”. असे स्पष्ट लिहिले आहे.
महाराष्ट्राचा ७/१२ अदानीच्या नावे लिहिणार का महायुती सरकार?
महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे.
महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा ७/१२ च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवलं आहे… pic.twitter.com/r3CPqsJwK1
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 29, 2024
याचबरोबर विजय वडेट्टीवार यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्राचा ७/१२ अदानीच्या नावे लिहिणार का महायुती सरकार? महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा ७/१२ च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवलं आहे का? शाळेच्या भिंतीवर आदराने आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांसोबत आता गौतम अदानी यांचा पण फोटो लावायची तयारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारकडून सुरू झाली आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.