'ते योगी नाही तर सत्ताभोगी, स्वतःला फकीर म्हणवणारे...'; काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
मुंबई : पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरकरुन सडेतोड उत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तीन दिवस युद्धाची तणावपूर्ण परिस्थिती होती. यामध्ये भारतीय सैन्याने त्याचीस ताकद दाखवून दिली असली तरी सध्या शस्त्रसंधी लागू झाली आहे. मात्र देशामध्ये सुरु असलेल्या तिरंगा रॅलीवर आता नेत्यांनी आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे.
सत्ताधारी नेत्यांकडून तिरंगा रॅली काढली जात आहे. यामध्ये अनेक राजकीय नेते सहभागी होत असून भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक केले जात आहे. हातामध्ये तिरंगा घेऊन लाखो लोक रस्त्यांवर उतरले आहे. यावरुन मनसे नेते अमित ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपला विजय झाला नसून शस्त्रसंधी सुरु असल्याची आठवण करुन दिली आहे. अमित ठाकरे यांच्या भूमिकेला कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील पाठिंबा दिला असून त्यांनी याबाबत मोदी सरकारला जाब विचारला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. वडेट्टीवार म्हणाले की, “मी त्यांच्या (अमित ठाकरे) मताशी सहमत आहे. युद्धबंदी म्हणजे विजय नव्हे. हा देशांमध्ये, जगामध्ये पहिल्या सत्ताधाऱ्यांचा प्रयोग दिसतोय की युद्ध झालं आणि युद्धबंदी झाली. युद्धबंदीनंतर तिरंगा यात्रा काढून काय संदेश द्यायचा आहे? जो प्रश्न अमित ठाकरेंनी विचारलाय त्या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावं,” अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लेखा समितीबाबत देखील विजय वडेट्टीवार यांनी मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “लोक लेखा समितीने नेहमी नियमाप्रमाणे विरोधी पक्ष नेत्याकडे याचे अध्यक्ष पद असते. त्यामुळे याचे अध्यक्ष पद माझ्याकडे आलेलं आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण समिती आहे. महाराष्ट्राचं काही शासनाचे कामकाज चालतं, शासनाची काही धोरणं राबवली जातात, शासनाच्या योजना राबवल्या जातात त्या पारदर्शकपणे झाल्या पाहिजे. शासनाचा महसूल कुठल्याही परिस्थितीत वाया जाऊ नये म्हणून त्यावर चर्चा करून तशा प्रकारचा अहवाल विधिमंडळात सादर करण्यासाठी ही समिती काम करते. यावर व्यापक काम करण्याची संधी या समितीच्या अध्यक्षाच्या माध्यमातून मला मिळाली आहे. महाराष्ट्रात नियमबाह्य जे काही कामं झाली असतील तर त्यातील चुका कशामुळे झाल्या? कोणामुळे झाल्या? हे सर्व माहिती घेऊन सभागृहापुढे जाणं हे काम आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू,” असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे.
अमित ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, “सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून Ceasefire (युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत. या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा ‘विजय यात्रा’ (मुख्यत्वे राजकीय स्वरूपातील) या समर्पक वाटत नाहीत. वास्तविक, या क्षणी देशवासीयांच्या मनात एकच भावना आहे, शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे.” असे अमित ठाकरे यांनी लिहिले आहे.