संभाजीराजे छत्रपती यांनी स्वराज्य पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सहभागाबाबत सांगितले आहे (फोटो - सोशल मीडिया)
कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निकाल दिला आहे. येत्या चार महिन्यांमध्ये महानगर पालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या निवडणुका एकत्र लढणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. तसेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा स्वराज्य पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत त्यांनी स्पष्ट मत मांडले आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक विषयांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “इतके फटके बसलेत त्यातून बाहेर पडणे अवघड आहे. त्यामुळे स्वराज्य पक्षाने निवडणूक लढवणे असे काही अद्याप ठरवलेले नाही. आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करू. निवडणूक लढवण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे पाहणे महत्त्वाचे आहे. या दृष्टिकोनातून विचार विनिमय सुरू आहे,” अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संभाजीराजे छत्रपती यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, “प्रामाणिकपणे राजकीय पक्ष चालवणे आजच्या घडीला अवघड आहे. राजकारण आणि परखड बोलणे याचा मेळ बसत नाही. राजकारण हा पैशाचा खेळ, आमच्याकडे पैसा नाही. पक्ष संघटन सोपे नाही पण काम करत राहणार. राजकारणात टिकणं हे खूप अवघड काम आहे,” अशी स्पष्ट भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.
रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याच्या मुद्द्यावर संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, “कायदेशीर मार्गाने किल्ले रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी. या वाघ्या कुत्रा संदर्भात कोणत्याच इतिहास संशोधक, अभ्यासाकडे पुरावे नाहीत, हे राज्य सरकारला स्पष्ट दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाजूला तितकीच मोठी समाधी उभा करणे ही दुर्दैवाची बाब आहे. 6 जून नंतर राज्य सरकारकडून समिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. सर्व पक्षाच्या आणि आघाडीच्या सदस्यांना या समितीत घ्यावे. कायदा हातात घेऊन कोणतेही कार्य करणार नाही. ठराविक दोघे जणच याबाबत वक्तव्य करत आहेत,” असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
परळीमधील सध्या शिवराज दिवटे यांना झालेल्या मारहाणीमुळे वातावरण तापले आहे. समाधान मुंडेच्या गॅंगकडून ही मारहाण झाली असून याचा धक्कादायक असा व्हिडिओ देखील व्हायरल झाला. याबाबत संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, “वाल्मिकी कराडला जेलमध्ये घातल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत झालं असं म्हणता येणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था निश्चित बिघडली आहे. हे सुसंस्कृत महाराष्ट्र नाही. हे महाराष्ट्राला परवडणार नाही. महाराष्ट्रात अशा गोष्टी चालू न देण्यासाठी मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालावे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी विशेष लक्ष त्यांनी घालावं,” असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केले आहे.