
DCM Ajit Pawar and CM Devendra Fadnavis meet at Varsha after Parth Pawar land scam case
Parth Pawar: पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची कंपनी एका जमिनीच्या व्यवहारामध्ये अडकली. कोट्यवधींची जमीन कमी किंमतीमध्ये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासाठी अगदी 500 रुपयांचा स्टॅम्प पेपरवर व्यवहार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी अजित पवारांवर तोंडसुख घेतले आहे. या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनी अमेडिया संबंधित एक अर्थिक व्यवहार घोटाळा प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे. पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटी रुपयांत विकलेल्या प्रकरणाची माहिती समोर आली आहे. या जमीन व्यवहारात गैरप्रकार झाले असून केवळ 500 रुपयांच्या स्टँपड्युटीवर हा व्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यावरुन विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
या प्रकरणाची पारदर्शक पद्धतीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र अजित पवार हे स्वतः उपमुख्यमंत्री असल्याचे याचा तपास पारदर्शक पद्धतीवर होईल का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर अजित पवार यांनी पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. नैतिकतेच्या जोरावर अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे या सर्व विरोधी नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर घेतली भेट
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आहेत. दोन्ही नेत्यांची मुंबईतील वर्षा बंगल्यावर भेट झाली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीबाबत हे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दोन्ही नेत्यांमध्ये या प्रकरणावरुन काय चर्चा होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणावर अजित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. तसेच या व्यवहाराबद्दल जास्त काही माहिती नाही, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर झाल्यानंतर हे प्रकरण समोर आल्याने राष्ट्रवादीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.