पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणी सीएम देवेंद्र फडणवीसांनी तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ निलंबित केले (फोटो - सोशल मीडिया)
Parth Pawar : पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनी अमेडिया संबंधित एक अर्थिक व्यवहार घोटाळा प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्यात आले आहे.
अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची कंपनीसंबंधित ही माहिती समोर आली आहे. पार्थ पवारांना 1800 कोटींची जमीन 300 कोटी रुपयांत विकलेल्या प्रकरणाची माहिती समोर आली आहे. या जमीन व्यवहारात गैरप्रकार झाले असून केवळ 500 रुपयांच्या स्टँपड्युटीवर हा व्यवहार झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. हे प्रकरण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील लावून धरले आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पार्थ पवारांबाबत समोर आलेल्या या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, अद्याप माझ्याकडे संपूर्ण प्रकरणाची माहिती आलेली नाही. प्राथमिकदृश्या जे मुद्दे समोर आले आहेत ते मात्र गंभीर आहेत. त्यामुळे योग्य माहिती घेऊन बोलेल. संपूर्ण माहिती बाहेर आल्यानंतर शासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल. सदर प्रकरणाबाबत मी सर्व माहिती मागवली आहे महसूल विभाग, आयजीआर, लॅन्ड रेकॉर्ड याची सर्व माहिती मागवली आहे. योग्य ते चौकशीचे आदेशही मी दिलेले आहे. सर्व माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी प्रतिक्रिया देईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी देत आपली नाराजी व्यक्त केली होती.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यानंतर आता पुण्यातील संबंधित तहसीलदारांवर कारवाई करण्यात आली आहे. पार्थ पवार जमीन प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तत्पूर्वी, पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे, राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता, याप्रकरणी अजित पवार आणि पार्थ पवार काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






