
'महापालिका भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारूंच्या टोळ्याही वाढल्यात'; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपवर हल्लाबोल
पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक भाजपविरोधात लढत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड महापालिका कर्जबाजारी झाली. शहरात लुटारूंच्या टोळ्या दिवसाढवळ्या वावरताहेत, भाजपची ही राक्षसी भूक पाहवत नाही, असा हल्लाबोल अजित पवारांनी केला.
पिंपरी येथे पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. अजित पवार पुढे म्हणाले, १९९२ ते २०१७ पर्यंत मी चिंचवड पिंपरी शहराचा कायापालट केला. हवा तो विकास केला. मात्र, २०१७ साली एक लाट होती. त्यावेळी विठ्ठल मूर्ती घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला. त्यावेळी ज्या महापौरांच्या काळात हे झालं, आज ते महापौर आमच्या विरोधात लढणाऱ्या भाजपमध्ये आहेत, असेही त्यांनी सांगितले. शरद पवारांनी पिंपरीत विकासाला कशी गती दिली, हे सांगताना त्यांनी थोरल्या पवारांचे कौतुक केले.
हेदेखील वाचा : PCMC Election 2026: ‘माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत…’; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार
दरम्यान, अजित पवार पुढे म्हणाले, २०१७ पूर्वी पिंपरी पालिकेच्या ४८४४ कोटींच्या ठेवी होत्या. आज या ठेवी २००० कोटींवर आल्यात. मुळात या ठेवी वाढायला हव्या होत्या. इतकंच नव्हे तर कर्ज रोखे काढून कोट्यवधीचे कर्ज केले. जर एवढा पैसा खर्च केला तर काम दाखवा?, असा सवाल त्यांनी भाजपला केला.
पुराव्याशिवाय मी बोलणार नाही
भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही. सर्वत्र हफ्तेखोरी सुरू आहे, त्याचे पुरावे माझ्याकडे आहे. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली रस्त्यांची वाट लावली. मी याबाबत पुरावे देईन. पुराव्याशिवाय मी बोलणार नाही, कोणावर बिनबुडाचे आरोप करणार नाही, असेही ते म्हणाले.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics : महायुतीमध्ये आली नामुष्की? अजित पवारांची पोलखोल अन् रवींद्र चव्हाणांचा पलटवार