PCMC Election 2026: 'माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप करण्यांसोबत मी आज सत्तेत...'; अजित पवारांचा भाजपवर जहरी पलटवार
Pimpri Chinchwad Mahangarpalika Election 2026: राज्यातील महापालिका निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशी निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. अनेक ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना वेगवेगळ्या लढताना दिसत आहेत. पु्ण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप स्वबळावर लढत असल्याचे दिसत आहे. असे असतानाच पुण्यात अजित पवार यांनी त्यांच्यावर झालेल्या ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचारावर भाष्य करत थेट भाजपवरच निशाणा साधला आहे.
माझ्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याचे तुम्हाला माहिती आहे. पण ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यां सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे ना, असा खरमरीत पलटवार करत अजित पवार यांनी थेट भाजपलाच कोंडीत पकडले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी पिपंरी-चिचवड महापालिकेत सत्तेवर असलेल्या भाजपवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले (Ajit Pawar slams BJP over Pimpri Chinchwad Mahangarpalika Election 2026)
राहुल नार्वेकरांचं टेन्शन वाढलं, काँग्रेसचं निवडणूक आयुक्तांना पत्र; गुन्हा दाखल होणार?
पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांचे सध्या भ्रष्टाचारातून पैसे कमावण्याचेच एकमेव लक्ष्य आहे. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेवर कर्जाच्या खाईत लोटले गेले, हे जनतेने पाहिले आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सुमारे ८,००० कोटी रुपयांच्या ठेवी सत्ताधाऱ्यांनी मोडल्या. या ठेवी मोडून नेमकी कोणती विकासकामे करण्यात आली, ती जनतेसमोर मांडावीत, असे खुले आव्हानही अजित पवार यांनी दिले. पिंपरी–चिंचवडमध्ये भ्रष्टाचार इतक्या टोकाला गेला आहे की अवघ्या सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी ८१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचा आरोपही यावेळी अजित पवार यांनी केला.
अजित पवार म्हणाले, “आम्ही कधीही सत्तेचा उन्माद होऊ दिला नाही. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्तेची मस्ती, नशा आणि माज चढला आहे,” पिंपरी–चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरली गेली असून रस्ते, शिक्षण, कुत्र्यांची नसबंदी यांसह अनेक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. सत्ताधारी भाजपकडे (BJP) शहराच्या विकासाचे कोणतेही ठोस व्हिजन नसल्याचे सांगत त्यांनी पिंपरी–चिंचवडच्या जनतेला ‘घड्याळ–तुतारी’ युतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. तसेच, “पिंपरी–चिंचवडमध्ये रोज पाण्याची व्यवस्था मी करेन. मी जे बोलतो, ते करून दाखवतो; तेवढी धमक माझ्यात आहे,” असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले, भाजपच्या काळात पिंपरी–चिंचवडमध्ये हफ्तेखोरी, रिंग करून पैसे लाटले
भाजपच्या सत्ताकाळात पिंपरी–चिंचवडमध्ये हफ्तेखोरी आणि टेंडर रिंग करून कोट्यवधी रुपये लाटण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते अजित पवार यांनी केला. “१९९२ ते २०१७ या कालावधीत मी पिंपरी–चिंचवड शहराचा कायापालट केला. हवा तसा विकास केला. मात्र २०१७ साली एक लाट आली आणि त्यानंतर विठ्ठल मूर्ती घोटाळा झाला. ज्या महापौरांच्या काळात हा प्रकार घडला, तेच महापौर आज भाजपमध्ये जाऊन आमच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
शरद पवार यांनी पिंपरी–चिंचवडमध्ये विकासाला गती दिल्याचे सांगत अजित पवार म्हणाले की, “२०१७ पूर्वी महानगरपालिकेच्या ठेवी ४,८४४ कोटी रुपयांच्या होत्या. आज त्या घटून अवघ्या २,००० कोटींवर आल्या आहेत. वास्तविक या ठेवी वाढायला हव्या होत्या. उलट सत्ताधाऱ्यांनी कर्जरोखे काढून महानगरपालिकेवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज लादले.”
भाजपच्या सत्ताकाळात टेंडरमध्ये रिंग करून पैसे लाटले गेल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, रस्ते अरुंद केल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. “आमच्या काळात शहरातून सुसाट प्रवास होत होता. मात्र ‘अर्बन स्ट्रीट’च्या नावाखाली रस्त्यांची वाट लावण्यात आली आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
अनेक रस्त्यांवर अतिक्रमण वाढले असून तिथे हफ्तेखोरी सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे अजित पवार म्हणाले. “गेल्या नऊ वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात असा विकास झाला आहे. टेंडर प्रक्रियेत दादागिरी केली जाते. मी यासंदर्भातील पुरावे देईन. पुराव्याशिवाय मी बोलणार नाही, कोणावरही बिनबुडाचे आरोप करणार नाही. ही राक्षसी भूक मला पाहवत नाही,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.






