dcm ajit pawar reaction on manikrao kokate controversial statement
Ajit Pawar Marathi News : पुणे : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचे नाव जोरदार चर्चेमध्ये आले आहे. कृषी खात्याचे मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या सभागृहामध्ये जंगली रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर कोकाटे हे शासनाला भिकारी म्हणाले यामुळे वाद आणथी चिघळला आहे. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणावर पहिल्यांदा राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. त्याचप्रमाणे माणिकराव कोकाटे यांच्यावर पक्षाकडून काय कारवाई केली जाणार यावर भाष्य केले आहे. अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांना भान ठेवून वागलं पाहिजे असं सांगितलं असल्याचे देखील सांगितले. यामुळे विधान परिषदेच्या सभागृहामध्ये जंगली रमी गेम खेळणं हे माणिकराव कोकाटे यांना भोवणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाले अजित पवार?
माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “कृषीमंत्री कोकाटे यांच्या बाबतीत मला जी माहिती मिळाली ती घटना सभागृहाच्या आत घडलेली आहे. आता हे तुम्हालाही माहिती आहे की विधानभवनाचा जो परिसर आहे तो परिसर विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यांच्या अखत्यारीत येतो. कृषीमंत्र्यांच्या व्हिडीओबाबत विधानसभा अध्यक्षांनी आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी देखील चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती मला मिळाली आहे”, असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
माझी आणि कोकाटे यांची अद्याप भेट नाही
पुढे अजित पवार म्हणाले की, “कृषीमंत्री कोकाटे मला अद्याप समक्ष भेटलेले नाहीत. बुधवारी दुपारी मी या ठिकाणी पोहचलो आहे. आज खरं तर दिल्लीत एक महत्वाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती देखील महत्वाची होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत. दरम्यान, कृषीमंत्री कोकाटे यांनी रमी खेळतानाच्या व्हिडीओबाबत स्पष्टीकरण दिलं आहे की ते गेम खेळत नव्हते वैगेरे माझी आणि कोकाटे यांची अद्याप भेट झालेली नाही. पण सोमवारी त्यांची आणि माझी भेट होईल,” असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याबाबत सोमवारी निर्णय होणार असल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अजित पवार म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्वच मंत्र्यांना सांगितलेले आहे की आपण नेहमी भान ठेवून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. अशा सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि मी देखील सर्वांना दिलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मंत्री कोकाटे यांच्याकडून अशाच प्रकारची गोष्ट घडली. तेव्हा देखील मी दखल घेत सांगितलं होतं की असं होता कामा नये. मात्र, तरीही दुसऱ्यांदा पुन्हा असाच प्रकार घडला. त्यानंतर पुन्हा आम्ही त्यांना जाणीव करून दिली की दोनदा झालंय तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका. मात्र, आता या घटनेबाबत कोकाटे म्हणतात की ते रमी खेळत नव्हते. त्या संपूर्ण प्रकरणात नेमकं काय खरे आहे ते सत्य समोर येईल. आता सोमवारी किवा मंगळवारी मंत्री कोकाटे यांना मी बोलावून समोरासमोर चर्चा करणार आहे आणि त्यानंतर मी निर्णय घेणार आहे”, अशा कडक शब्दांत माणिकराव कोकाटे यांना अजित पवार यांनी इशारा दिला आहे.