
DCM Eknath Shinde visit Nanded showcase dhondge political power
Eknath Shinde in Nanded : लोहा : लोहा येथे आयोजित शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून, लोहा कंधार मतदारसंघ भगवामय करण्याचा निर्धार माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशानंतर या मतदारसंघाचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलल्याचे दिसून येत आहे. धोंडगे यांचा दोन्ही तालुक्यांमध्ये मोठा जनाधार असल्याने आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर या बदलाचा निश्चितच प्रभाव पडणार, असा राजकीय (Political News) विश्लेषकांचा अंदाज आहे.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रविवार, दि. २९ रोजी लोहा येथे होणाऱ्या या मेळाव्यात मार्गदर्शन करणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, युवानेते शिवराज धोंडगे व दिलीप धोंडगे यांना लोहा कंधारच्या राजकीय पटावर शिवसेनेच्या माध्यमातून प्रभावीपणे पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसते. धोंडगे बंधूंची ही जोडी आगामी काळात मतदारसंघाच्या राजकारणावर ठसा उमटवेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा : “अजूनही वेळ गेलेली नाही…: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बड्या नेत्याचे सूचक वक्तव्य
एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर
एकूणच, या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने लोहा कंधारमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद दाखवण्याबरोबरच आगामी निवडणुकांसाठी राजकीय समीकरणे नव्याने आकार घेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ हे रविवार २९ मार्च रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार २९ मार्च रोजी मुंबई येथून सायंकाळी ४.१५ वा. विमानाने नांदेडकडे प्रयाण करणार असून सायंकाळी ५.१५ वा. विमानतळ येथे आगमन व तेथून मोटारीने हिंगोली गेटकडे प्रयाण करणार आहेत. सायं. ५.३० वा. आ. आनंदराव बोंढारकर यांच्या शिवनेरी शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. सायं. ६.३० वा. लोहा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व पक्ष प्रवेश सोहळ्यास ते उपस्थित राहणार असून रात्री ८ वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
हे देखील वाचा : Rupali chakankar Resign Breaking: अखेर रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हिंगोली गेट येथील शिवनेरी या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार दि. २९ मार्च रोजी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथराव शिंदे यांचे हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता पार पडणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांच्यासह हेमंत पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार बाबुराव कदम कोहळीकर आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि जनतेसाठी हे संपर्क कार्यालय सदैव खुले असणार आहे. त्यामुळे जनकल्याणासाठी शिवनेरी जनसंपर्क कार्यालय आज पासून लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे शिवनेरी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास नांदेड जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींनी आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकानी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.